९४ लाखांचा निधी : घरकुलांचे तीन हप्ते अडलेगोंदिया : शहरातील ६६ निराश्रितांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी ‘रमाई’ योजना आधार देणारी ठरली आहे. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील या निराश्रीतांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. यासाठी ९४ लाख ३५ हजार रूपयांचा निधी देण्यात आला असून या घरकुलांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. आपले स्वत:चे हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जीवनात काही असो-नसो मात्र डोक्यावर स्वत:चे छत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:चे घर आहे तो आज नशिबवान समजला जातो. कारण आजच्या महागाईला बघता स्वत:चे घर बांधणे सर्वाच्याच आवाक्यात राहिलेले नाही. त्यातही हातावर कमावून खाणाऱ्यांचे तर सोडूनच द्यावे. अशा निराश्रीत गरजूंसाठी शासनाने ‘रमाई आवास योजना’ सुरू केली आहे. ही योजना अशा निराश्रीतांसाठी त्यांना हक्काचे घरकूल मिळवून देणारी ठरत आहे. अनुसूचित जातीतील दरिद्रय रेषेखालील(बीपीएल) व दारिद्रय रेषेवरील (एपीएल) दोन्ही घटकांसाठी ही योजना शासन राबवित आहे. यात बीपीएलसाठी १.५० लाखांचे तर एपीएलसाठी १.३५ लाखांचे अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत शहरातील ६६ निराश्रीतांना सन २०१५-१६ या वर्षात घरकूल मंजूर करण्यात आले आहे. यात ३५ लाभार्थी बीपीएल असून ३१ लाभार्थी एपीएलचे आहेत. यासाठी शासनाकडून ५२.५० लाख रूपये बीपीएलसाठी तर ४१.८५ हजार रूपये एपीएलसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. (शहर प्रतिनिधी)
६६ निराश्रीतांना ‘रमाई’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 00:43 IST