देवरी : महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प अख्ख्या महाराष्ट्रासह तालुक्यातही राबविण्यात येत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा’ या घोषवाक्याच्या आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याचा १५ ऑगस्टला श्रीगणेशा झाला आहे. आता या ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास ५ दिवस उरले असूनही शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद दिसून येत आहे.
ई-पीक पाहणी ॲपचे लाँचिंग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-पीक पाहणी ॲप देशाला मार्गदर्शक ठरेल, असे म्हटले होते. आज दररोज हवामानात बदल होत असून कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होत आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात. कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते; पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असेही बोलले जा आहे; परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प असल्याने ई-पीक योजना तालुक्याला अपवादच ठरणार आहे.
तालुक्यातील काही गावांंमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ॲपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. तालुक्यात तहसीलदार नसल्याने मंडळ अधिकारी, कामगार, तलाठी पीक पाहणी ॲपचा वापर करण्याचे आवाहन करीत आहेत. ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी ॲपमधून नोंदणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत.
-------------------------
बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
तालुक्यात महसूल विभागाचे अधिकारी थेट बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत आहेत की नाही, हाही संभ्रमच आहे. गावातील सुशिक्षित मंडळी, शिक्षक, डाटा ऑपरेटर यांना ई-पीक नोंदणीचे प्रशिक्षण देत आहेत की नाही, हाही संभ्रमच आहे. येत्या ५ दिवसांच्या आत या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून आर्थिक मदतीला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे.
------------------------------
शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद
तालुक्यातील शेतकऱ्यांचा अद्यापही अल्प प्रमाणात प्रतिसाद आहे. त्यामुळे आता तहसीलदारांच्या अभावामुळे
मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कुणाचे वचक नसल्याने गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ई-पीक पाहणी ॲपची माहिती देत खरिपाची पीक नोंदणी करण्याचे आवाहन करीत आहेत की नाही, हाही संभ्रमच आहे.