भूजल सर्व्हेक्षणात पास : १०९ वाळूघाटांचे सर्वेक्षणगोंदिया : जिल्ह्यातील वाळूघाटांचे १०९ प्रस्ताव सन २०१४-१५ साठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले, यापैकी भूवैज्ञानिकांनी ५० वाळूघाटांच्या लिलावाला मान्यता दिली आहे. मात्र त्यापैकी एक घाट वनकायद्यामुळे रद्द होणार असून ४९ प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविले जाणार आहेत.जीएसडीएने मान्यता दिलेल्या ५० वाळूघाटांच्या प्रस्तावांपैकी बोंडरानी रेतीघाटाला वनसंवर्धन १९८० च्या तरतुदी लागू होत आहेत. त्यामुळे सदर वाळूघाट अमान्य करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त वाळूघाटांची जिल्ह्यातील संख्या ४९ होणार आहे. पर्यावरणाच्या मंजुरीकरिता सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांसह ग्रामसभेचे ठराव व वाळूघाटांचा गाव नकाशा आवश्यक असतो. त्यामुळे तहसीलदारांकडून वाळूघाट लिलाव घेण्यास हरकत नसल्याचे ठराव व गाव नकाशा प्राप्त होताच पर्यावरणाची मंजुरी प्राप्त करण्यासाठी फॉर्म-१ तयार करून प्रस्ताव शासनास सादर करण्यात येतील. सन २०१४-१५ साठी जीएसडीए (भूजल सर्व्हेक्षण विभाग) कडून जिल्ह्यातील एकूण १०९ प्रस्तावांपैकी ५० प्रस्तावांना मान्यता दिली आहे. गोंदिया तालुक्यातील एकूण १६ प्रस्तावांपैकी १० मान्य तर ६ अमान्य करण्यात आले आहेत. तिरोडा तालुक्यातील १९ प्रस्तावांपैकी १४ मान्य, गोरेगाव तालुक्यातील सहापैकी एक, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील चारपैकी एक, देवरी तालुक्यातील सात प्रस्तावांपैकी दोन, आमगाव तालुक्यातील २७ प्रस्तावांपैकी नऊ मान्य, सालेकसा तालुक्यातील एकूण आठ प्रस्तावांपैकी तीन मान्य व सडक/अर्जुनी तालुक्यातील २२ प्रस्तावांपैकी १० प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. पर्यावरण विभागाच्या मान्यतेनंतरच सदर वाळूघाट लिलावासाठी पात्र ठरतील.(प्रतिनिधी)
४९ वाळूघाटांचा होणार लिलाव
By admin | Updated: October 30, 2014 22:52 IST