गोंदिया : दरवर्षी रेल्वेला हजारो कोटींचा नफा होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी रेल्वे विभाग नफ्यात की तोट्यात याची माहिती प्रवाशांना झाली नाही. दारिद्रयरेषेखालील असलेली नागपूर विभागाची रेल्वे नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ओढवणारी आहे. नागपूर विभागातील ७१५ रेल्वे फाटकांपैकी ४६७ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. यामुळे निर्मनुष्य रेल्वे फाटकांवर मोठे अपघात घडत आहेत. रेल्वेला दरवर्षी हजारो कोटींचा फायदा होत असल्याचे आर्थिक संकल्पात सांगितले जाते. रेल्वे प्रवासी भाडे वाढवून आता रेल्वने मोठा नफा कमविण्याचा प्रयत्न केला. रेल्वेला मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या महसूलच्या रकमेतून रेल्वेस्थानकांना मॉडल स्टेशन बनविण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू आहे. परंतु मानवविरहित रेल्वे फाटकांवर मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात रेल्वे विभाग अपयशी ठरला आहे.त्या मानवविरहित रेल्वे फाटकांवर मनुष्यबळाची व्यवस्था न करता नागरिकांनीच या रेल्वे फाटकावरून ये-जा करताना गाडी येत आहे का याची खात्री करूनच रुळ ओलांडावे लागते. गोंदिया ते चंद्रपूर या रेल्वे रूळावर ८९ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. चंद्रपूर ते नागपूर या रूळावर १६६ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत तर रामटेक, बिरसोला, रुमनापूर, लामठा, बालाघाट, वारासिवनी, गोवारीघाट, नैनपूर, चिरालडोंगरी, इतवारी व खापरखेडा या रेल्वे रुळावर २१२ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. रेल्वे विभागातर्फे अनावश्यक बाबीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येते. परंतु अत्यावश्यक ठिकाणी रेल्वे विभाग खर्च करण्यात मागे-पुढे पाहत आहे. गोंदिया ते चंद्रपूरदरम्यान असलेल्या मानवविरहित फाटकांवर मागील ७ वर्षात १५ अपघात घडले. यात मोठ्या प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झाली. रेल्वे रुळालगत झाडे-झुडपे असल्याने मानवविरहित फाटक ओलांडणाऱ्या वाहनांना गाडी येते किंवा नाही याची माहितीही होत नाही. परिणामी मानवविरहित फाटकांवर अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. ७१५ पैकी ४६७ रेल्वे फाटक मानवविरहित आहेत. तर काही फाटकांव रेल्वे विभागाने मोबाईल मॅन ठेवले आहेत. या मानवविरहीत फाटकावर फाटक बसविण्यात आले नाही. किंवा मनुष्यबळाची निर्मीती केली नाही त्यामुळे दरवर्षी या फाटकांवर अपघात घडतात. (तालुका प्रतिनिधी)
४६७ रेल्वे फाटक देतात मृत्यूला आमंत्रण
By admin | Updated: July 15, 2014 00:04 IST