मार्केटिंग फेडरेशन : यंदा ४,३३,६४४ क्विंटल धान खरेदी गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे विविध धान खरेदी केंद्रांमार्फत जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले. त्याचे काही शेतकऱ्यांना चुकारे करण्यात आले. तर काही शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळाले नाही. आताही काही शेतकऱ्यांनी विकलेल्या धानाच्या हुंडीची रक्कम ३ कोटी ७५ लाख रूपये शासनाकडून मार्केटिंग फेडरेशनला अप्राप्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत.या आर्थिक वर्षात मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्हाभरातून एकूण ४६ धान खरेदी केंद्रांमार्फत एकूण ४ लाख ३३ हजार ६४४.१० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. या धानाची रक्कम ५८ कोटी ९८ लाख ११ हजार २५६ रूपये एवढी आहे. परंतु तीन कोटी ७५ लाख रूपयांची हुंडी रक्कम अद्याप अप्राप्त असल्याने काही शेतकरी आपल्या परिश्रमाच्या मोलापासून वंचित आहेत.या प्रकाराबाबत मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, हुंडी मर्यादेनुसार हुंडी रक्कम प्राप्त होताच वितरित केली जाते. हे रूटीनचे काम असून हुंडी लावलेले वाटप करण्यात आले आहे. तर ३१ मार्चपर्यंत काही उशिरा गेल्यामुळे काही हुंडी रक्कम प्राप्त होणे बाकी आहेत. येत्या दोन-चार दिवसांत रक्कम प्राप्त होताच ती वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
३.७५ कोटींचे चुकारे प्रलंबित
By admin | Updated: April 29, 2015 00:01 IST