नवेगावबांध : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रोज वाढत आहे. अर्जुनी मोरगाव तालुकाही कोरोनाचा हाॅटस्पॉट होत आहे. नवेगावबांधमध्ये सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा ३० वर पोहोचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे आरटीपीसीआर व अँटिजन तपासणी मोहीम राबविली जात आहे. यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.
परिसरातील भिवखिडकी येथे दोन एकूण संख्या ३, चान्ना बाकटी येथे ६ एप्रिल रोजी २३ नागरिकांची रॅपिड अँटिजन तपासणी करण्यात आली. त्यात चान्ना येथे ३, विहीरगाव २ ,सिलेझरी १, तर खांबी येथील ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. यापूर्वी तालुक्यातील झाशीनगर येथे ३६ कोरोनाबाधित आढळल्याने कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ग्रामीण रुग्णालय सोडले तर प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील ही कोरोना लस संपल्यामुळे लसीकरण बंद आहे. कोरोनाबाधितांची घरे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून स्टीकर लावून घोषित केले जात आहेत. आरोग्य केंद्राच्या वतीने वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी उपाययोजना व जनजागृती, कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांनी दिली आहे.
........
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा
कोरोनाचा नवीन प्रकार जास्त संसर्ग पसरविणारा असून यापासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी. लग्न समारंभ ,स्वागत समारंभ, उत्सव टाळावे. तसेच गरज असल्यासच घराबाहेर पडावे, मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तरच आपण या संसर्गापासून दूर राहू शकतो. असे ग्रामीण रुग्णालय नवेगावबांधचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी कळविले आहे.
.......