बिरसी-फाटा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कंबर कसून असलेल्या तिरोडा पोलिसांनी होळीचा सण बघता ९ ठिकाणी धाड घालून एक लाख ८१ हजार ९५० रूपयांची दारू व मोहासडवा जप्त केला आहे. तसेच एक भट्टी सुद्धा उधळून लावली आहे. शनिवारी (दि.२७) सकाळी ९ वाजतापासून रात्री ८ वाजतापर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.
होळीत कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून तिरोडा पोलिसाचे दररोज विशेष अभियान राबवून अवैध धंद्यावर धाडसत्र सुरु आहे. त्यात शनिवारी (दि.२७) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ९ अवैध दारू विक्रेत्यांवर धाडसत्र राबविले. यात, ग्राम मेंढा-सुकडी येथील झुडपी जंगल शिवारात सुरु असलेल्या भट्टीवर पोलिसांनी धाड टाकली असता तेथे दिलीप राधेश्याम खरोले, ऍलन संजय बरेकर, जतीन दिलीप खरोले व अनमोल हंसराज बरेकर (सर्व रा.संत रविदास वॉर्ड, तिरोडा) हे मोहाफुलांची दारू काढताना मिळून आले. पोलिसांनी त्याच्याकडील ८८ हजार रूपये किमतीचा ११०० किलो सडवा मोहफूल, भट्टीचे साहित्य व २ मोटारसायकल असा एकूण एक लाख ६५ हजार १५० रूपयांचा माल जप्त केला. तसेच प्रतिमा विनय उके (रा. वडेगाव) हिच्या घरातून १६ हजार रूपये किमतीचा २०० किलो सडवा मोहाफूल व दोन हजार रूपये किमतीची २० लीटर मोहादारू असा एकूण १८ हजार रूपयांचा माल जप्त केला. आशा राजेंद्र भोंडेकर (रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा) हिच्या घरातून दोन हजार रूपये किमतीची २० लीटर मोहादारू, मुनीबाई रमेश चौरे (रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा) हिच्या घरातून दोन हजार रूपये किमतीची २० लीटर मोहादारू, सीमा अनिल राऊत (रा. संत कबीर वॉर्ड, तिरोडा) हिच्या घरातून तीन हजार रूपये किमतीची ३० लिटर मोहादारू, गीता छोटेलाल दमाहे (रा. गुरुदेव वॉर्ड, तिरोडा) हिच्या घरातून दोन हजार रूपये किमतीची २० लिटर मोहादारू जप्त केली.
तसेच शांता सीताराम बावणे (रा. चिखली) हिच्या घरातून दोन हजार रूपये किमतीची २० लिटर मोहादारू, निर्मला भोला रंगारी (रा. चिखली) हिच्या घरातून तीन हजार रूपये किमतीची ३० लिटर मोहादारू तर अंजना विजय लिल्हारे (रा. भूतनाथ वॉर्ड, तिरोडा) हिच्या घरातून एक हजार रूपये किमतीची १० लीटर मोहादारू अशाप्रकारे एकूण एक लाख ८१ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश पारधी, पोउपनि केंद्रे, महिला पोउपनि राधा लाटे, चेटुले, दामले, नापोशी बांते, बारवाय, बर्वे, श्रीरामे, मुकेश थेर, शिपाई सवालाखे, दमाहे, बिसेन, उके, अंबादे, शेख महिला नापोशी भूमेश्वरी तीरीले यांनी केली.