गोंदिया : जिल्ह्यात लघुसिंचन (जल संधारण) विभागांतर्गत १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे महामंडळ व १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचे शासकीय निधीअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांची १४.७४ कोटींची कामे अपूर्ण आहेत. या कामांना जून महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. परंतु यात महामंडळाकडून होणाऱ्या अनेक कामांना सुरूवातच झालेली नाही. अशात वेळेवर कामांना पूर्ण करणे अशक्य ठरणार आहे.गोंदिया तालुक्याच्या पिंडकेपार, दासगाव (किन्ही), विर्सी येथे साठवन बंधारे, तिरोडा तालुक्याच्या गोंडमोहाळी, गराडा, ठाणेगाव येथे कोल्हापुरी बंधारे तसेच सोनोली व मलपुरी येथे साठवण बंधारे, आमगाव तालुक्याच्या गांधीटोला येथे साठवन बंधारा, सडक-अर्जुनी तालुक्याच्या खोडशिवनी, लेंडेझरी, कोकणा, चिरचाडी येथे साठवन बंधाऱ्यांची कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेश मिळून तीन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला. परंतु आतापर्यंत कामांना सुरूवातच करण्यात आले नाही. पावसामुळे काम सुरू होवू शकले नाही तसेच काही कंत्राटदार काम सुरू करण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे.महामंडळाच्या निधीतून होणाऱ्या १०० हेक्टरपर्यंतच्या सिंचन कामांत टेमनीच्या प्रकल्पाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून येथील काम बंद पडलेले असून आतापर्यंत सुरू झाले नाही. दत्तोरा, सेजगाव, डब्बेटोला, पिंडकेपार-१, पिंडकेपार-२, खमारी (भिवापूर), लाखेगाव, पालडोंगरी-२, बरबसपुरा, खामखुर्रा, चिल्हाटी, मुल्ला-२, कोयलारी, वृंदावनटोला (खजरी), डोंगरगाव (सडक), हेटी (गिरोला), पिंडकेपार (रिठी) येथील काम अपूर्ण पडून आहेत. कुटे पाच टक्के तर कुठे ५० टक्के तर कुठे ८० टक्के काम झाले आहे.निधीचा अभाव काम प्रलंबित राहण्यामागील प्रमुख कारण आहे. परंतु पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने काम सुरू होवू शकले नाही, असे विभागाकडून सांगण्यात येते. शासकीय निधीअंतर्गत १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या कामांत मानाकुही लघुसिंचन योजनेचे जलाशय पूर्ण झाले आहे. तेथे कांक्रिट चॅनल प्रस्तावित आहे. नवीन सुधारित बजेट तयार करण्याचे काम मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. देवरी तालुक्यात महाजनटोला येथील जलाशय पूर्ण झाले आहे. १५० मीटर लांब डाव्या कालव्याचे काम बाकी आहे. गोंदिया तालुक्यातील कामठा, खातिया, सालेकसा तालुक्यातील उसियो (बिजेपार), कोटरा (हलबीटोला) गावांसाठी नवीन सुधारित बजेट बनविण्याचे प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. सदर बजेट बनल्यानंतर मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. १०१ ते २५० हेक्टर क्षमतेच्या सहा प्रकल्पांसाठी ६.८५ कोटी रूपयांची गरज भासणार आहे. तर १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या ३६ कामांसाठी ७.८९ कोटी रूपयांची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
लघुसिंचनाची १४.७४ कोटींची कामे अपूर्ण
By admin | Updated: March 20, 2015 00:51 IST