गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञासह तब्बल १४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे स्वॅब नमुने तपासणीच्या कामावर याचा परिणाम झाल्याने प्रलंबित स्वॅब नमुन्यांची संख्या ४,२३५ वर पोहोचली आहे. मात्र, येत्या तीन-चार दिवसांत सुरळीतपणे स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे येथील मेडिकलमधील प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. प्रयाेगशाळेचे तज्ज्ञ आणि कर्मचारी दिवसरात्र काम करून दररोज दोन हजारांवर स्वॅब नमुने तपासणी करीत होते. मात्र येथीलच १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने याचा स्वॅब नमुने तपासणीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, बुधवारी नागपूर येथून मनुष्यबळ मागवून स्वॅब नमुने तपासणीची गती वाढविण्यात आली आहे. तसेच ऑटोमेटीक मशीनचे साहित्यसुद्धा मागविण्यात आले आहे. ही मशीन वापरण्याची परवानगी मिळताच स्वॅब तपासणीची प्रक्रिया अधिक वेगवान होणार असल्याचे प्रयोगशाळेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रलंबित नमुन्यांची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.