आज मतदान : २१ संवेदनशील तर २१ उपद्रवी केंद्र, चोख बंदोबस्तगोंदिया : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या निवडणूक रणसंग्रामाचा बुधवारी (दि.१५) मतदानाने शेवट होणार आहे. चारही विधानसभा मतदार संघात मतदानासाठी १२३४ मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. त्यात गोंदिया मतदार संघातील २१ केंद्र संवेदनशील असून नक्षलग्रस्त आमगाव मतदार संघातील १५ व अर्जुनी मोरगाव मतदार संघातील ६ असे २१ मतदान केंद्र उपद्रवी म्हणून नोंदविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.निवडणुकीच्या या कामात लागलेल्या ५५६३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून स्ट्राँग रूममधून मतदान यंत्रांची तपासणी करून ते ताब्यात घेऊन आपापले मतदान केंद्र गाठण्यास सुरूवात केली. सायंकाळपर्यंत सर्व केंद्रावरील कर्मचारी दिलेल्या ठिकाणी पोहोचले. बुधवारी सकाळी ७ वाजताच सर्व केंद्रांवर मतदानाला सुरूवात होणार आहे. मात्र आमगाव विधानसभा मतदार संघातील केंद्रांवर केवळ दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान सुरू राहणार आहे. इतर केंद्रांवर सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार आहे. यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत सर्व कर्मचारी आपापल्या मतदार संघाच्या स्ट्राँग रूममध्ये मतदान यंत्र घेऊन पोहोचतील. विशेष म्हणजे यावेळी महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना या निवडणूक कामातून वगळण्यात आले आहे. ९९.९९ टक्के महिलांना घेतलेले नाही, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर यांनी सांगितले.गोंदिया मतदार संघातील मतदान यंत्र जिल्हाधिकारी कार्यालयामागील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात, तिरोडा मतदार संघातील यंत्र तेथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, अर्जुनी मोरगाव मतदार संघातील यंत्र तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत, तर देवरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतदान यंत्र तेथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ठेवले जाणार आहेत.दरम्यान गुप्त प्रचाराअंतर्गत सायंकाळी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. यासाठी विश्वासातील कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसत होते. (जिल्हा प्रतिनिधी)
१२३४ मतदान केंद्र सज्ज
By admin | Updated: October 14, 2014 23:19 IST