गोंदिया : सशस्त्र दूरक्षेत्रात कोणी अडीच तर कोणी तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर बदल्या झाल्या. त्यांना लगतचे पोलीस ठाणे देण्यात आले. बदली झालेल्या ठिकाणी बिऱ्हाड मांडून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच पुन्हा १२२ पोलीस कर्मचाऱ्यांची सशस्त्र दूरक्षेत्रात बदली झाली. हे अन्यायकारक असून मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रकार असल्याचे नमूद करीत अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रसंगी माहिती अधिकाराखाली माहिती मागणार, असा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे.गडचिरोली परिक्षेत्र नागपूरच्या प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी २४ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक विशेष अभियान मुंबई यांनी ३१ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. या वेळी पोलीस अधीक्षकांचा प्रभार राकेशचंद्र कलासागर यांच्याकडे होता. भेटीदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तत्कालीन प्रभारी पोलीस अधीक्षक राकेशचंद्र कलासागर यांनी जिल्ह्यातील १२२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या सशस्त्र दूरक्षेत्रात बदल्या केल्या. १२२ कर्मचाऱ्यांपैकी कोणी अडीच तर कोणी तीन वर्षे सशस्त्र दूरक्षेत्रात नोकरी केली आहे. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांची लगतच्या पोलीस ठाण्यात बदली झाली. बदली होवून आजघडीला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नाही, तोच पुन्हा बदल्यांच्या यादीत या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यादीतील स्वत:ची नावे पाहून कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एवढेच नव्हे तर बसलेले बिऱ्हाड पुन्हा उठवावे लागणार आहे. यात मानसिक व शारीरिक त्रासाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. बदल्या करताना कोण किती वर्षे सशस्त्र दूरक्षेत्रात नोकरी केली, हेसुद्धा पडताळून पाहण्यात आले नाही. अडीअडचणी समजून घेण्यात आल्या नाहीत. साधी विचारणादेखील करण्यात आली नाही. हे नियमांना अनुसरून नाही. त्यामुळे या बदल्यांना स्थगिती देण्यात यावी, याकरिता अन्यायग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय माहितीच्या अधिकारात माहिती मागून यातील तथ्य उघड करणार असल्याचेही पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले (प्रतिनिधी)
बदलीविरुद्ध १२२ पोलीस जाणार कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 00:43 IST