शिक्षक बडवाईक यांचा उपक्रम : १०० टक्के विद्यार्थ्यांना स्पर्धेत आणण्याचा प्रयत्न गोंदिया : देवरी तालुक्याच्या डवकी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत सहायक शिक्षक नरेश रतन बडवाईक या शिक्षकांने ज्ञान रचनावाद या अभिनव उपक्रमाला साथ देण्यासाठी स्वत:च्या वाढदिवशी विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करून या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना १० हजाराचे बक्षीसे स्वत:च्या खिशातून वाटली. सामान्य ज्ञान परीक्षा माध्यमिक व प्राथमिक अशा दोन गटात घेण्यात आली. वर्ग ३ ते ४ करीता प्राथमिक तर ५ ते ७ करीता माध्यमिक गट तयार करण्यात आला. माध्यमिक विभागातून प्रथम येणाऱ्या भाग्यश्री नंदकिशोर कापसे हिला सायकल, द्वितीय क्रमांक घेणाऱ्या लिना किशोर निंबेकर इंग्रजी शब्दकोष, तृतीय क्रमांक घेणाऱ्या संदीप चमरू लटये याला एक डझन रजिस्टर, प्राथमिक विभागातून प्रथम येणाऱ्या अपूर्व मनोज टेंभरे याला एक डझन रजिस्टर, द्वितीय प्रेरणा नाईक हिला अर्धा डझन रजिस्टर तर तृतीय क्रमांक घेणाऱ्या लक्की श्यामराव बोहरे याला कंपास पेटी देण्यात आली. तसेच शाळेतील १५५ विद्यार्थ्यांना रजिस्टर, टाय, बेल्ट व ८७ मुलींना रिबन देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. बक्षीस वितरण वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी.बी.साकुरे, केंद्रप्रमुख इ.एन. येळणे, मुख्याध्यापक ए.के.बंसोड व शिक्षक नरेश बडवाईक यांच्या हस्ते देण्यात आले. या उपक्रमाला सरपंच सुषमा येल्ले, उपसरपंच उमराव बावणकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश बावणकर, उपाध्यक्ष राऊत, किशोर निंबेकर, गौरव परसगाये, चंद्रकिशोर लांजेवार, नारायण राऊत, विश्वनाथ पळसगाये, ज्योती बडवाईक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वी.टी.बहेकार, एच.जी.टेंभरे, ललीता थुलकर, अर्चना निखाडे, सुनंदा किरसान यांनी सहकार्य केले. संचालन व्ही.टी.बहेकार तर आभार ललीता थुलकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
सामान्य ज्ञानात भर पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजारांची बक्षिसे
By admin | Updated: July 25, 2016 00:31 IST