पणजी : यंदाचा इफ्फी हा दर्जात वाढ आणि खर्चात कपात करणारा म्हणजेच स्वस्तात मस्त इफ्फी या शब्दात वर्णन करता येईल, असा दावा गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर ऊर्फ दामू नाईक यांनी केला आहे. ५० टक्के खर्चाला यंदा कात्री लावल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ॅ आत्तापर्यंत चाललेल्या इप्फीवर काय प्रतिक्रिया देणार? - इफ्फी कसा आहे, यावर माझी प्रतिक्रिया विचारण्याऐवजी इफ्फीसाठी आलेले प्रतिनिधी आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांना विचारले, तर तुम्हाला वास्तव समजेल. माझ्या मते खर्चाला कात्री लावून स्वस्तात मस्त इफ्फी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत १३ हजारांहून अधिक प्रतिनिधी, कलाकार व इतर मिळून ३ हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावली आहे. कांपाल येथील खुल्या स्क्रिनवरील चित्रपट पाहाण्यासाठी २ हजार लोकांनी हजेरी लावली आहे. ॅ स्थानिकांना प्राधान्य न दिल्याचा आरोप केला जात आहे... - मुळात गोमंतकीयांना डावलल्याची माहितीच चुकीची आहे. दुसरी गोष्ट इफ्फी हा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचाच तो झाला पाहिजे. स्थानिकांच्या कामात गुणवत्ता नाही, असे मला मुळीच म्हणायचे नाही; परंतु गुणवत्तेच्या बाबतीत स्थानिक आणि परप्रांतीय असा भेद करणे मला योग्य वाटत नाही. शिवाय ‘केवळ गोमंतकीयांसाठीच’ अशा स्वरूपाचे राज्यात वर्षभर अनेक कार्यक्रम साजरे होतच असतात. ॅ खर्चाला कात्री लावल्यामुळे दर्जाचे काय? - काटकसर करताना इफ्फीची गुणवत्ता ढळू देण्यात आलेली नाही. काटकसरीचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ १० दिवसांसाठी मंच उभारण्यासाठी यापूर्वी १० लाख रुपयापर्यंत खर्च केला जात होता, तो यंदा केवळ १ लाख रुपयांहून कमी खर्चात उभारण्यात आला आहे. ई-टेंडरिंगद्वारे दीड कोटी रुपये खर्च कमी करण्यात आला. मडगाव व इतर ठिकाणीच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना २ कोटी रुपये खर्च कमी करण्यात आला. अशा अनेक जागा होत्या की, त्या ठिकाणी कमी खर्चाने कामे करून घेण्यात आली आहेत.
यंदाचा इफ्फी स्वस्तात मस्त
By admin | Updated: November 28, 2014 00:22 IST