लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: दिल्लीतील आपचे नेते संजय सिंग यांच्याविरोधात सुलक्षणा सावंत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या याचिकेवर शुक्रवारी डिचोली न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पुढील सुनावणी होईपर्यंत तसेच न्यायालयात खटल्याची प्रक्रिया सुरु असेपर्यंत संजय सिंग हे सावंत यांच्याविरोधात बदनामीकारक विधान करणार नाहीत, अशी ग्वाही त्यांचे वकील एस बोडके यांनी दिली.
यावेळी सुलक्षणा सावंत यांचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी सांगितले की, या प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत सिंग यांच्याकडून कोणतेही बदनामीकारक विधान येणार नाही, अशी ग्वाही त्यांचे वकील बोडके यांनी न्यायालयात दिली आहे.
सुनावणीवेळी सुलक्षणा सावंत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुनील मनोहर, प्रल्हाद परांजपे, अॅड. संजय सरदेसाई, अॅड. अथर्व मनोहर, अॅड. टेंबे व अॅड. ए. एस. कुंदे उपस्थित होते.
१०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा
या प्रकरणात आता २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आपचे नेते संजय सिंग यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गोव्यातील सरकारी नोकर भरती प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यावर आरोप केले होते. आरोपांनतर सुलक्षणा सावंत यांनी संजय सिंग यांच्याविरुद्ध १०० कोटींचा अबू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी डिचोली न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली.