लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : मी मांद्रे मतदारसंघात २०२२च्या निवडणुकीत पराभूत झालो, तरीही कार्यालय, कर्मचारी जनतेच्या सेवेत आहेत. मी निवडणुकीसाठी सज्ज आहे. भाजपचे १० हजारांहून अधिक ऑनलाईन सदस्य नोंदवून मोहीम पूर्ण केली आहे. त्यामुळे पक्ष कार्याची कदर करेल, असा विश्वास आहे, असे भाजप प्रवक्ते तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले.
मांद्रे भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळ अध्यक्ष उत्तम पोखरे, गोविंद आसगावकर, राज्य कार्यकारिणी सदस्य अनंत गडेकर व मंडळ सरचिटणीस प्रदीप नाईक उपस्थित होते.
हरमल येथील मृत अमर बांदेकर यांच्या खून प्रकरणी पर्यटन खात्याने सबंधित शेंक मालकास २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम बांदेकर यांच्या कुटुंबास द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मांद्रेत विशेष विकास प्रकल्प आपल्या कार्यकाळात झाले, असेही सोपटे यावेळी म्हणाले.
सोपटे यांनी गोवा रॉक्स संघटनेने ३५ टक्के व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती असल्याचे सांगितले. याचा अर्थ सरकार व खात्याचे लक्ष नसल्याने असे खुनी हल्ले व खुनाचे प्रकार होत असल्याचे दिसते. या सर्व परप्रांतीय व्यावसायिकांवर कलम २० अंतर्गत कारवाई व्हावी. त्यांचे आम्ही स्वागत करू, मांद्रे पोलिस स्थानकात तक्रारी दाखल करून घेण्यास नकार दिला जातो, याचे आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले.
जनतेसाठी स्थानक आणले. मात्र गुन्हे वाढले आहेत. जुगार अड्ड्यांवर मारहाणीचा प्रकार घडला तरी त्याची तक्रार घेतली जात नाही. त्यामुळे पोलिस निरीक्षक सरकारला घाबरत नाही का? असा प्रश्न पडतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणीही केली.
यंदाच्या हंगामात परप्रांतीय लोक स्थानिक युवकांचा खून करतात, हे राज्यासाठी लांच्छनास्पद आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी पर्यटन खात्याने घ्यावी. किनारी भागात जेष्ठ नागरिकांना चालत जाणेही धोक्याचे बनले आहे. परप्रांतीयांची दादागिरी वाढत आहे. ती मोडित काढण्याची गरज आहे. यासाठी त्वरित कारवाई करावी. - दयानंद सोपटे, भाजप प्रवक्ते तथा माजी आमदार
----००००----