नावात काय आहे? नुसता गोंधळात गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 11:26 AM2024-03-12T11:26:35+5:302024-03-12T11:27:21+5:30

पोर्तुगीजांच्या इतिहासातील खुणा पुसून टाकू असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले होते. त्याची सुरुवात गावांची नावं बदलून करण्यास हरकत नाही.

what in a name just chaos in chaos | नावात काय आहे? नुसता गोंधळात गोंधळ!

नावात काय आहे? नुसता गोंधळात गोंधळ!

मयुरेश वाटवे, वरिष्ठ साहाय्यक संपादक

दुचाकीवर एक जोडपं पाठीमागे बायको बसलेली. तिनं राणी लक्ष्मीबाईसारखं आपलं मूल पाठीला बांधलेलं. नवन्यानं सोयीसाठी आपली बॅग समोर पायाकडे ठेवली होती. मागे बायको मोबाईल धरून मॅपवरून आपल्या जायच्या जागा आणि त्याचा मार्ग त्याला सांगत होती.

म्हापशाकडून पणजीच्या दिशेने येताना पूल काढल्यावर आणि जिथे रायबंदर, पणजी शहर, मडगाव-वास्को येथे जाण्याचे सर्व रस्ते एकत्रच मिळतात, त्या हीरा पेट्रोलपंपच्या अलीकडील सर्कलकडे काहीच न समजून त्यानं अचानक ब्रेक मारला. मी त्यांच्या मागोमाग होतो, त्यामुळे मलाही करकचून ब्रेक मारावा लागला. गेल्या काही वर्षांत असे अनेक लोक माझ्या गाडीखाली येता येता वाचले आहेत. ते त्या मॅपमध्ये एवढे घुसलेले असतात की जणू कोणी हिप्नोटाईज केलं असावं. एकत्रच चार रस्ते दिसले आणि फर्स्ट एक्झिट, सेकंड एक्झिट असं अनाकलनीय काही गुगल मॅपवालीनं सांगितलं की प्रत्येकाचं होतं तेच त्याचं झालं असावं.

गोव्याला पर्यटक हवे आहेत, त्यावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे, त्यामुळे मला अलीकडे अशा प्रकारांचा राग येत नाही, आपण स्वीकारलेल्या मॉडेलचा तो साईड इफेक्ट आहे. 'अतिथी देवो भव' म्हणून मी काच खाली करून त्याला विचारलं, 'क्या हुआ भय्या?' 'दिवार जाना है'... काही क्षण जॉनी लिव्हरसारखी माझी भूला स्थिती झाली. हे नेमकं कुठे आलं ते मी आठवू लागलो. मग लक्षात आलं दिवाडी, त्यानंतर त्याला मार्ग सांगितला.

म्हणजे जी मुळातच गावाची नावं नाही आहेत, ती नावं आपण दागिन्यांसारखी पर्यटन नकाशावर का मिरवतो आहोत? दिवार, चोराव (स्पेलिंग चोराव पण उच्चार शोरांव), आरपोरा, आरांबोल... यादी खूप मोठी आहे. केपेसारखं (काही जणं क्वेपे वाचतात) 'क्यू' या इंग्रजी अक्षरावरून सुरू होणारं नाव वाचायचं कसं हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. देशात इतरत्र 'क' वरून सुरुवात होणाऱ्या नावांसाठी 'के' हेच इंग्रजी अक्षर वापरतात, गोव्यात मात्र 'क्यू' आणि 'सी' वापरलं जातं. एकदा कसल्या तरी भाषांतरासाठी गावाचं नाव आलं QUEULA. असं काही गाव असल्याचं माझ्या तरी ऐकिवात नव्हतं. माझा जन्म इथला, सगळी हयात इथे गेली. हे कुठून आलं? मग जाहिरातीतील इतर नावं बघितली तर ती फोंड्याच्या आसपासची होती. म्हणून तिथल्या काही माणसांना वॉटसअॅप केलं आणि हे कोणतं गाव आहे ते कळवा असं सांगितलं. तर त्यांनाही काही पत्ता नाही. मग माझीच दिमाग की बत्ती (आग लागो त्या बत्तीला असा संताप आला) उजळली आणि ते 'कवळे' असल्याच्या निष्कर्षापर्यंत आलो.

पेन्ह द फ्रान्स, साल्वादोर दु मुंद वगैरे नावाचं तर गावही नाही. फक्त पंचायतीचं नाव आहे. गोव्यात अशा अनेक पंचायती आहेत ज्या नावाचं गावच अस्तित्वात नाही. या गुलामीच्या खुणा खरं तर पुसायला हव्यात, सोपी, सुटसुटीत, लोकांना समजतील अशी इंग्रजी स्पेलिंग्स करता येणार नाहीत का?

दक्षिण गोव्यातील किंवा अगदी उत्तर गोव्यातून वाळपई वगैरे भागातून एखादी व्यक्ती आली तर ती पेन्ह द फ्रान्स आणि साल्वादोर दु मुंद शोधत बसली तरी तिच्या हाती काहीच लागणार नाही. असे एक ना अनेक घोळ नावाबाबत गोव्यात आहेत. त्याचा सरकारने विचार करायला हवा, तालुक्याचं गाव (ठिकाण, शहर) अशी एक संकल्पना आहे. पण गोव्यात सत्तरी, बार्देश, तिसवाडी, सासष्टी या तालुक्यांचं गाव कोणतं? (ते वाळपई, म्हापसा, पणजी, मडगाव असं करता येईल) जसं फोंडा आहे, काणकोण आहे, डिचोली आहे.

पोर्तुगीज गेले तरी त्यांच्या पद्धतीनं लिहिलेली ही नावं बदलली गेलेली नाहीत. पोर्तुगीजांच्या इतिहासातील खुणा पुसून टाकू असं मध्यंतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले होते. त्याची सुरुवात गावांची नावं बदलून करण्यास हरकत नाही. इच्छाशक्ती असेल तर हे होतं. दिल्लीत रेसकोर्सचं लोक कल्याण मार्ग झालं, औरंगझेब रोडचं अब्दुल कलाम रोड झालं, राजपथचं कर्तव्यपथ झालं. गोव्याच्या बाबतीत हे होण्याची अपेक्षा करावी का?

 

Web Title: what in a name just chaos in chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा