वास्को : भारतीय तटरक्षक दल देशाच्या समुद्रकिनाऱ्याचे दहशतवाद्यांपासून, तसेच अतिक्रमण करणाऱ्यांपासून संरक्षण करणारे प्रथम दल आहे. सध्या तटरक्षक दलाच्या ताफ्यात वाढ करण्याची गरज आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात शक्यतो भारतीय बनावटीची साधनसामग्री वापरण्यात येईल; पण काही इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा तयार होत नसल्याने त्यांची आयात करावी लागते; पण पुढील काळात भारतीय शास्त्रज्ञच त्यांची निर्मिती करतील, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. सोमवारी सायंकाळी मुरगाव बंदरातील जेटीवर तटरक्षक दलात आलेल्या ‘अमोघ, अमेय’ या गस्तीनौका आणि चार्ली ४१३ व चार्ली ४१४ या इंटरसेप्टर बोटी तटरक्षक दलाच्या ताफ्यात रुजू करण्यात आल्या. या वेळी आयोजित कार्यक्रमात पर्रीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पर्रीकर म्हणाले, तटरक्षक दलामध्ये संध्या १८४ जहाजे आहेत. पुढील महिन्यात त्यामध्ये आणखी दोन गस्तीनौकांची भर पडणार आहे. तटरक्षक, तसेच हवाई वापरात मदत करण्यात येईल. तसेच लार्सन टुर्ब्रो या शिपयार्ड कंपन्यानी वेळेपूर्वीच या जहाजांची बांधणी पूर्ण केल्याने ते अभिनंदनास पात्र ठरत आहे. यापुढे गोवा शिपयार्डलासुद्धा जहाजे बांधण्याचा आॅर्डर देण्यात येईल. तत्पूर्वी मुरगाव बंदरातील जेटीवर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांना तटरक्षक दलाच्या ५० सैनिकांच्या पथकाने मानवंदना दिली. तद्नंतर कोची शिपयार्ड कंपनीचे निवृत्त कमांडर के. सुब्रम्हण्यम आणि लार्सन टुब्रो या कंपनीचे निवृत्त कमांडर अशोक खैतान यांनी आपल्या यार्डाच्या कामगिरीचा अहवाल सादर केला. भारतीय तटरक्षक दलाचे डायेक्टर जनरल व्हाईस अॅडमिरलनी स्वागत केले. आयसीजीएस अमेय जहाजाचे प्रमुख कमांडर अनुराग चौधरी, आयसीजीएस अमोघचे प्रमुख कमांडंट अवतार सिंग, चार्ली ४१३ ते प्रमुख उपकमांडंट नितीन शर्मा आणि चार्ली ४१४ चे प्रमुख उपकमांडंट बाबू कुमार यांनी तटरक्षक दल कार्यालयाकडून ही जहाजे तटरक्षक दलाच्या ताफ्यात समावून घेण्याच्या काढलेल्या आदेशाचे वाचन केले. तद्नंतर राष्ट्रगीतांची धून वाजवून या जहाजावर भारतीय तिरंगा तसेच तटरक्षक दलाचा ध्वज फडकाविण्यात आला. त्यानंतर पर्रीकर यांच्या हस्ते कळ दाबून जहाजांच्या नावाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, अनघा आर्लेकर सौ. व श्री. अनंत शेट, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा , गोवा नौदल ध्वजाधिकारी बी.परहार, नौदल तसेच तटरक्षक दलाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भारतीय सामग्रीतून शस्त्रसज्जतेचा प्रयत्न
By admin | Updated: January 20, 2015 02:14 IST