पणजी : मराठीलाही राजभाषेचा दर्जा न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवू, असा इशारा मराठी राजभाषा समितीतर्फे रविवारी येथे झालेल्या मेळाव्यात दिला. या वेळी अपक्ष आमदार नरेश सावळ उपस्थित होते. येत्या अधिवेशनात राजभाषा कायदा दुरुस्ती विधेयक सादर करणार असल्याचे सावळ यांनी सांगितले. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेपर्यंत मराठीप्रेमींची साथ सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार विष्णू वाघ मात्र मेळाव्याकडे फिरकले नाहीत. आझाद मैदानावर या मेळाव्यात मराठीप्रेमी वक्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठी राजभाषेच्या बाबतीत आता स्वस्थ बसणार नाही, असे सर्व वक्त्यांनी ठणकावून सांगितले. मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर म्हणाले की, बोडगेश्वर मैदानावर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा घेतलेला ठराव भाजपने पाळला नाही, तर येत्या विधानसभा निवडणुकीत देवच त्यांना धडा शिकवील. आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. सर्व मराठीप्रेमी संघटना एकत्र येऊन लढा तीव्र केला जाईल. भाजप सत्तेवर आल्यास तीन महिन्यांत मराठीला राजभाषेचे स्थान देऊ, असे आश्वासन मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. श्रीपाद नाईक यांनीही अशीच हमी दिली होती. कुठे गेली ही आश्वासने? विधानसभेत ३0 आमदार होते तेव्हा १८ ते २0 जण मराठीच्या बाजूने होते; परंतु त्यांना त्या वेळी मतस्वातंत्र्य दिले नाही. व्हीप काढण्यात आला. असाच व्हीप काढून मराठीलाही राजभाषेचा दर्जा देणारे विधेयक मंजूर करा. अध्यक्षस्थानावरून प्रा. गोपाळराव मयेकर यांनी, भाजपने मराठीसाठी आधी दिलेल्या आश्वासनांचा पाढाच वाचला. १९८0 ते ८२ दरम्यान आझाद मैदानावर पर्रीकर, श्रीपाद यांनी तमाम मराठीप्रेमींच्या उपस्थितीत मराठीला राजभाषा करण्याची शपथ घेतली होती, त्याला या दोघांनी हरताळ फासल्याचे ते म्हणाले. नाव न घेता भाजपवर त्यांनी टीकेची झोड उठवली. हे लोक रामाचे नाव घेतात; परंतु रामासारखे आचरण मात्र नाही. राम एकवचनी होता. प्राण गेले तरी वचन पाळणारा होता. यांच्या बाबतीत तसे नाही. मराठीच्या बाबतीत फसवणूक केलेली आहे, असा आरोप त्यांनी केला. माजी मंत्री पांडुरंग राऊत, मगोचे नारायण सावंत, रणजितसिंह राणे, राजन कडकडे, दिवाकर शिंक्रे, भारती परांजपे, अर्चना कोचरेकर, शांताजी गावकर, शशिकांत सरदेसाई, निवृत्त शिक्षक सुरेश कामत, शाणुदास सावंत आदींची या वेळी भाषणे झाली. माजी आमदार मोहन आमशेकर उपस्थित होते. मेळाव्यास गोव्यातील अनेक भागांतून मराठीप्रेमींनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी)
निवडणुकीत भाजपला धडा शिकवू
By admin | Updated: January 11, 2016 01:18 IST