श्रीकृष्ण हळदणकर ल्ल चोडण तिसवाडी तालुक्यातील सुंदर अशा चोडण बेटावर सध्या दिल्लीस्थित बड्या धेंडांचा डोळा पडला आहे. पडीक शेतजमिनी विकत घेऊन बक्कळ पैशाच्या जोरावर या जमिनीत पैशासाठी काहीही उद्योग करण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत. बडी धेंडे, वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक संस्थांची अभद्र युती जल, जंगल आणि जमिनीची कितीही प्रमाणात वाटोळे करू शकते, हाच अनुभव वारंवार घ्यावा लागत आहे. चोडणच्या पश्चिम बाजूकडील मांडवी नदीजवळील १ लाख ४४ हजार चौरस मीटर जमीन एका दिल्ली येथील रिसोर्ट मालकाने घेतली. अगदीच कमी दराने हा व्यवहार झाल्याचा बोलबाला आहे. त्याने कंत्राटदाराच्या माध्यमातून काही स्थानिकांना हाताशी धरून या जमिनीत बांध दरुस्तीची परवानगी घेतली. या बड्या असामीने या जमिनीत बांध दुरुस्त न करता सखल जमिनीत मातीचा मोठ्या प्रमाणात भराव घालून जमिन बुजविण्याचाच उद्योग केला. हा प्रकार पाच महिन्यांपासून चालू आहे. नारळाच्या झाडांचे निमित्त बांध फुटून खारे पाणी आलेल्या या जमिनीत शेती करणार असे सांगून या खाऱ्या जमिनीत १००० वर नारळाची रोपे लावली आहेत. यासाठी नारळाच्या मुळांना मातीचा भराव व सखल अशा शेतीत रस्ते, दगड व कॉँक्रिट संरक्षक भिंतीचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी जेसीबी, ट्रक व कामगारांचा वापर चालू आहे. हा सर्व बहाणा असल्याची लोकांत चर्चा आहे. काही दिवसांनंतर नारळाची झाडे गायब झालेली दिसतील, असे बोलले जाते. ‘अर्थपूर्ण’ मौनीबाबा ऐवढे मोठे काम चालू असतानाही त्या प्रभागाच्या पंच व पंचायतीच्या सरपंच दोनशे मीटरवर असूनही काहीच न कळावे म्हणजे तोंडावर पाघरुण ओढून झोपेचे सोंगच. पंचायतीतील विरोधी पंचांनीही चुप्पी साधली आहे. त्यांची तर वाचाच गेल्याची स्थिती का झाली असावी? कोणत्या ‘अर्थपूर्ण’ घडामोडी घडल्या असाव्यात?
चोडण बेटावरही जल, जंगल, जमिनीचे वाटोळे
By admin | Updated: December 26, 2015 01:51 IST