सुशांत कुंकळयेकर-मडगाव : पावसाळ्यातील धर्तीवरील स्वर्ग अशी प्रसिध्दी मिळविलेल्या दूधसागराचे दर्शन घेण्यासाठी हजारो पर्यटकांचे लोंढे दूधसागरच्या दिशेने जाताना दिसतात. मात्र, या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे़ तर दुसरीकडे दूधसागरावरून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकजवळच्या जमिनीची मालकी रेल्वेची का वन खात्याची? या वादात धोक्याची सूचना देणारे फलक लावणेही मुश्कील बनले आहे. मे महिन्यापासून दूधसागरावरील पर्यटकांचे लोंढे वाढू लागले आहेत. मागच्या साडेतीन महिन्यांत या ठिकाणी तब्बल पाचजणांना बुडून मृत्यू आला आहे. १७ आॅगस्ट रोजी इचलकरंजीहून ३० पर्यटकांचा गट आला होता. त्यातील तोल जाऊन खाली पडल्याने शब्बीर नेसावी या ३८ वर्षीय युवकाचा बळी गेला होता. या घटनेनेनंतर म्हणजे २० आॅगस्टला आणखी एक अनोळखी मृतदेह सापडला आहे. जून महिन्यात पुण्यातील स्टीफन ओव्हळ (२२) तसेच स्थानिक युवक राजेश नाईक (३२) या दोघांना मृत्यू आला होता. तर मे महिन्यात दिवाडी येथील क्लेटो वाझ या २५ वर्षीय युवकाचा दूधसागराने बळी घेतला होता. या संदर्भात कुळेचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी म्हणाले, दूधसागराचा कडा धोकादायक असून त्यामुळेच हे अपघात घडतात. हे अपघात कमी व्हावेत यासाठी पर्यटकांना धोक्याच्या सूचना देणारे फलक या ठिकाणी लावावेत, अशी आम्ही वन खात्याला सूचना केली होती. वन खात्याने तसे फलक लावलेही मात्र काही दिवसातच हे फलक हटविले गेले. वन खात्याकडे चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की रेल्वे मार्गाजवळील जागा स्वत:च्या मालकीची आहे असा दावा दक्षिण मध्य रेल्वे करत आहे आणि त्यामुळेच वन खात्याने लावलेले हे फलक हटविले गेले आहेत. वन खात्याच्या वन्यजीव विभागाचे डेप्युटी कंझर्वेटर डॉ. अनिल कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ‘पर्यटकांना सोयीचे व्हावे यासाठी वन खात्याने वेगवेगळ्या सूचना देणारे फलक या ठिकाणी लावले होते; पण रेल्वे अधिकाऱ्यांनी ते काढून टाकले, असे अनिल कुमार म्हणाले. वास्तविक कॅसलरॉक ते कुळेपर्यंतचा संपूर्ण लोहमार्ग महावीर अभयारण्य कक्षेतून जात आहे आणि ही सर्व जागा वन खात्याची आहे. या संदर्भात आपण दक्षिण मध्य रेल्वेच्या हुबळी कार्यालयाशी संपर्क साधला आहे व त्यांना पत्रही लिहिले आहे; पण अजूनही रेल्वेकडून उत्तर आले नसल्याची माहिती कुमार यांनी दिली.
पर्यटक जातात जीवानिशी़़़
By admin | Updated: August 25, 2014 01:00 IST