वास्को : ऐन पावसाळ्यात बायणा समुद्रकिनाऱ्यावरील होडीमालकांनी सुरक्षिततेसाठी आपली मच्छीमारी होडी व्होळांत समुद्रकिनाऱ्यावर नांगरून ठेवल्याने वास्कोतील मच्छीमार आणि व्होळांत गावातील नागरिक यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. सध्या त्या गावात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे़ दरवर्षी, बायणा समुद्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने तसेच वादळी लाटांमुळे समुद्रकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होत असते़ हल्लीच काटे बायणा येथे तुफानी लाटांमुळे किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या डिंगी होड्या तसेच ‘पनेळ’ होड्या व मच्छीमारी जाळी समुद्रात वाहून गेल्याने मच्छीमारांचे बरेच नुकसान झाले होते़ पावसाळ्यात होडी नांगरण्यास हा किनारा सुरक्षित नसल्याने काही मच्छीमारांनी आपल्या होड्या व्होळांत येथील किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या़ तसेच त्या समुद्री भागात मासेमारीही केली होती़ त्यामुळे खोलांत या भागातील मच्छीमारांनी वास्कोतील मच्छीमारांना त्या भागात मासेमारी करण्यास व किनाऱ्यावर होडी नांगरून ठेवण्यास मनाई केली़ तसेच वास्कोतील मच्छीमारांना जीवे मारण्याची धमक्या दिल्या व होडीवर काम करणाऱ्या मजुरांवर हल्लाही केला़ त्यामुळे वास्को मच्छीमार आणि वेळसांव, कासांवली, व्होळांत या भागातील मच्छीमार यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला़ या संघर्षामुळे व्होळांत गावात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली़ दरम्यान, कुठ्ठाळी मतदारसंघाच्या आमदार तथा पर्यटनमंत्री एलिना साल्ढाणा यांना या दोन्ही गटांतील संघर्षाची माहिती मिळाल्यावर त्यांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करून तडजोडीचा प्रयत्न केला़ त्यांनी वेर्णा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेलेल्या व्होळांत, वेळसांव, कासांवली भागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना आपापल्या क्षेत्राच्या सीमेतच मासेमारी करण्याचे व होड्या नांगरून ठेवण्याची विनंती करून दोन्ही गटांतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले़तद्नंतर वास्कोतील ओल्ड क्रॉस होडीमालक संघटना, खारवीवाडा, दिस्तेरो मच्छीमार संघटना आणि बायणा रापोणकार होडीमालक संघटना या तीन संलग्नित संघटनेच्या सुमारे १५० सदस्यांनी वेळसांव, कासांवली आणि व्होळांत या भागातील मच्छीमारांकडून बायणा किनाऱ्यावरील बैठकीत मिळालेल्या धमकीचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्या विरुध्द आवाज उठविण्यासाठी समुद्रातील वादळी हवामानामुळे त्यांना व्होळांत येथील किनाऱ्यावर मासळी उतरविण्यास तात्पुर्ती मुभा देण्याची मागणी राज्य सरकार आणि मच्छीमार खात्याकडे केली आहे़ (प्रतिनिधी)
वास्कोत दोन गटांत वाद
By admin | Updated: August 5, 2014 01:47 IST