वास्को : वेर्णा येथे रविवारी, दि. २१ रोजी दोघा युवकांनी केलेल्या जबर मारहाणीनंतर सुरेंद्र बेतकीकर (वय ४0) यांचा सोमवारी मृत्यू झाला. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी विराज माजगावकर व सोनू सातार्डेकर या दोन २५ वर्षीय युवकांना मंगळवारी भा.दं.सं.च्या ३०२ कलमाखाली अटक केली. वेर्णा पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र बेतकीकर आणि संशयित विराज व सोनू हे तिघेही जीवलग मित्र असून ते सांकवाळ येथील माउंट मेरी कॉलनीत राहात असत. रविवारी रात्री सुरेंद्र बेतकीकर यांच्या घरी एक सोहळा होता आणि या सोहळ्यास दोघेही उपस्थित होते. तिथे जेवणखाण केल्यानंतर ते आपल्या घरी परतले. काही वेळानंतर ते पुन्हा सुरेंद्र यांच्या घरी आले आणि त्यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत होऊन विराज व सोनू यांनी सुरेंद्र यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाल्याने त्यांना त्वरित बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांच्या जखमेवर टाके घालण्यात आले व उपचार करून घरी पाठविण्यात आले. परंतु, सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांना उपचारासाठी पुन्हा बांबोळीला नेण्यात येत असता, वाटेतच निधन झाले. वेर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी या दोन्ही युवकांवर गुन्हा नोंदवून अटक केली. उत्तरीय तपासणीत सुरेंद्र यांच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक शैलेंद्र नार्वेकर तपास करत आहेत. सुरेंद्र बेतकीकर यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. (प्रतिनिधी)
वेर्णा येथे युवकाचा खून?
By admin | Updated: February 24, 2016 02:34 IST