पणजी : पावसाचा जोर ओसरला तरी कोसळणाऱ्या सरी आणखी दोन दिवस कोसळत राहातील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कमी दाबाचा पट्टा हा मध्य ईशान्य भागाच्या दिशेने वळल्यामुळे आणखी तीन-चार दिवसांनंतर परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सोमवारीही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. कल्पना १ उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रांनुसार गोवा आणि शेजारील राज्यांच्या आकाशात पावसाच्या ढगांचे थर अजूनही दाटलेले आहेत. त्यामुळे दोन दिवस तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता भूभागावरून उत्तर ईशान्य भागात सरकल्यामुळे गोवा आणि शेजारील राज्ये त्याच्या प्रभावापासून हळूहळू अलिप्त होतील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. चोवीस तासांत सरासरी दोन इंच, तर एकूण हंगामी पाऊस १०७ वर पोहोचला आहे. पावसाची नोंद झाली आहे. सांगे, केपे आणि मडगावमध्ये तीन इंच पावसाची नोंद झाली आहे, तर वाळपईत २.६ इंच पाऊस पडला. केपेत पडलेल्या तीन इंच पावसामुळे या तालुक्यातील सरासरी एकूण पावसाने शंभरी ओलांडली आहे. (प्रतिनिधी)
आणखी दोन दिवस संततधार शक्य
By admin | Updated: September 1, 2014 02:07 IST