लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या प्रत्येक मंत्र्याच्या तसेच महामंडळांचे अध्यक्ष असलेल्या आमदारांच्या कामाचा आता पंचनामा होणार, हे निश्चित आहे. मंत्रिमंडळ फेरबदल निकट असल्याचे संकेत नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल दिल्लीत केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन गोव्यात परतल्यानंतर पुन्हा एकदा दिले आहेत. दिल्ली दौरा आटोपून काल सायंकाळीच ते गोव्यात परतले. त्यानंतर 'लोकमत'शी बोलताना त्यांनी सांगितले की, केवळ मंत्रीच नव्हेत तर वेगवेगळ्या महामंडळांचे अध्यक्ष असलेल्या आमदारांच्या कामाचाही आढावा घेतला जाईल. मंत्र्यांचा लोकांशी संपर्क कसा आहे, त्यांच्या खात्यातील काम कसे चालले आहे हे निकष लावून प्रत्येकाचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल. मंत्रिमंडळात जे काही बदल करायचे असतील ते मुख्यमंत्री तसेच केंद्रीय नेत्यांशी सल्लामसलत करूनच होतील.'
दामू यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनाही भेटले. दोघांनीही गोव्यातील राजकीय स्थिती जाणून घेतली. तसेच संघटनात्मक कामाबद्दलही दामूंकडून माहिती घेतली.
कोणत्याही मंत्र्याने मंत्रिपद म्हणजे आपले संस्थान मानू नये, असे दामू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर 'लोकमत'शी संवादावेळी ठणकावले होते. मंत्रिमंडळात फेरबदल होणारच व जे काही बदल होतील ते केंद्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनानुसारच होतील, असे त्यांनी म्हटले होते. या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत नड्डा यांची घेतलेली भेट तसेच नंतर बी. एल. संतोष यांच्याशी केलेली चर्चा राजकीय गोटात चर्चेची ठरली आहे.
दामू यांचे पक्षापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही अपेक्षा, स्वार्थ न ठेवता येणाऱ्यांचे पक्षात स्वागतच करू, असे त्यांनी नड्डा यांनाही सांगितल्याची माहिती मिळते. आगामी जिल्हा पंचायत निवडणुका, पालिका तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणखी मजबूत करणे हे दामू यांच्यापुढील आव्हान आहे. त्या अनुषंगानेही त्यांची पुढील पावले पडणार आहेत.