डिचोली : उत्खनन केलेल्या खनिज माल वाहतूक दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी ट्रकमालक व सेसा कंपनीचे अधिकारी यांच्यात वाटाघाटी घडवून आणण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेली बोलणी फिस्कटली. खाण कंपनी व ट्रकमालक संघटना आपापल्या मागणीवर ठाम राहिल्याने आता हा संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारपासून पुन्हा पाळीतील बॉम्बे रोडवर ट्रकमालक जमा होणार असून मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष चालूच राहणार असल्याचे सांगिण्यात आले. गेले काही दिवस ट्रकमालक संघटनेने आंदोलन पुकारले होते. त्यावर निर्णायक तोडगा काढता यावा यासाठी आमदार डॉ. प्रमोद सावंत, उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, ट्रकमालक संघटनेचे पदाधिकारी व सेसा कंपनीच्या अधिकऱ्यांची संयुक्त बैठक बुधवारी दुपारी उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांच्या कार्यालयात झाली. या वेळी सावंत यांनी दर वाढून देण्याची मागणी केली. मात्र, डॉलरचा दर घसरल्याने बरीच ओढाताण होत असून दर वाढवणे शक्य नसल्याचे या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रति किलोमीटर ८ रुपये असा दर देण्याचा प्रस्ताव कंपनीने ठेवला आहे. मात्र, हा दर ट्रकमालकांना अजिबात मान्य नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. बैठकीत ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस, विनोद पेडणेकर, प्रकाश गावस, मंगलदास नाईक, श्रीधर माडकर, विनायक गावस, शिवदास माडकर तसेच पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्यासह सेसा कंपनीचे प्रल्हाद केरकर, अब्दुला खान, जोसेफ कोडलो, सीताराम वालावलकर इत्यादी सहभागी झाले होते. दोन्ही गटांशी चर्चा करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन्ही गट ठाम राहिल्याने बोलणी फिस्कटली असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
ट्रकमालक-सेसा बोलणी फिस्कटली
By admin | Updated: December 10, 2015 01:52 IST