पणजी : माध्यान्ह आहारातून चपातींचा पुरवठा करण्यास स्वयंसाहाय्य गटांचा आक्षेप आहे. याविषयी तोडगा काढण्यासाठी सरकारच्या शिक्षण खात्याने माध्यान्ह आहाराच्या कंत्राटदार असलेल्या राज्यातील सर्व स्वयंसाहाय्य गटांची गुरुवारी सायंकाळी चार वाजता खात्याच्या सभागृहात बैठक बोलावली आहे. रोज हजारो चपात्या आम्हाला पुरविणे शक्य होत नाही. तसेच पहाटे केलेल्या चपात्या मुलांपर्यंत माध्यान्ह आहार जाईपर्यंत घट्ट होतात, अशा प्रकारच्या तक्रारी शिक्षण खात्याकडे आल्या. माध्यान्ह आहाराविषयी अन्यही काही तक्रारी आहेत. आपली बिलेही वेळेत दिली जात नाहीत व त्यामुळे आर्थिकदृष्ट्या माध्यान्ह आहाराचे कंत्राट आम्हाला परवडत नाही, अशा प्रकारचाही सूर काहीजणांनी लावला आहे. या सर्व विषयांवर शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट हे आज चर्चा करणार आहेत. चपाती माध्यान्ह आहारातून वगळावी किंवा ती आठवड्याला एकदाच मुलांना पुरविली जावी, अशा प्रकारचा निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे. बहुतांश मुलांना भाजी-पाव खाणे आवडते, असेही स्वयंसाहाय्य गटांचे म्हणणे आहे. माध्यान्ह आहारातून पुलाव यापूर्वी रद्द करण्यात आला आहे. रोज वेगवेगळ््या प्रकारची भाजी विद्यार्थ्यांना द्यावी, असे ठरलेले आहे. (खास प्रतिनिधी)
चपातीबाबत आज निर्णय
By admin | Updated: November 26, 2015 01:35 IST