लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात प्रत्येक वाचकाच्या मनात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळवलेले लोकमत दैनिक आज बुधवारी आपला १६ वा वर्धापन दिवस साजरा करत आहे.
२००९ साली गोव्यात लोकमतची आवृत्ती सुरू झाली होती. वाचक आणि हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळे लोकमत घरोघरी पोहचला. अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाला. वाचकांसोबतचे ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावेत, यासाठी दोनापावला-पणजी येथील दि इंटरनॅशनल सेंटरच्या आबोली हॉलमध्ये आज स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, वाचक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
गोव्यात 'लोकमत' हे अल्पावधीतच गोमंतकीयांच्या पहिल्या पसंतीचे लोकप्रिय दैनिक बनले. लोकमतची कुजबूज वाचली नाही तर दिवस जात नाही असे सांगणारे लाखो वाचक तयार झाले. आज सकाळी लोकमतच्या पाटो पणजी येथील कार्यालयात सत्यनारायण महापूजा होईल. त्यानंतर सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ यावेळेत दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये स्नेहमेळावा होईल. राजकीय, सामाजिक, उद्योग, क्रीडा आदी क्षेत्रातील मंडळींसह लोकमतच्या सर्व वाचकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.