पणजी : राज्यातील दूध उत्पादक संस्थांचे मार्च २०१४ पर्यंत थकलेले आधारभूत किमतीचे पैसे आठवडाभरात दिले जातील, अशी ग्वाही पशुसंवर्धन खात्याचे मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी सहकार खात्याच्या कारभारावर टीका करत दूध उत्पादक शेतकऱ्यांना भीक नको, तर दुधास योग्य दर द्या, अशी मागणी केली. प्रश्नोत्तराच्या तासावेळी राणे यांनीच याबाबतचा मूळ प्रश्न मांडला होता. गोवा डेअरीसाठी शेतकरी दुधाचा पुरवठा करतात. आता मजुरांचा दर, गाई-म्हशींच्या खाद्याचा दर वाढलेला असल्याने डेअरी व्यवसाय परवडत नाही. त्यामुळे सरकार या शेतकऱ्यांना दुधावर वाढीव किंमत देईल काय, अशी विचारणा राणे यांनी केली होती. त्यावर अशी किंमत वाढविण्याचा निर्णय गोवा डेअरीकडून वेळोवेळी घेतला जातो, असे सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी सांगितले. ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या दुधाचे दर वाढतात; पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही मिळत नाही. सरकार दुधाच्या लिटरमागे नऊ रुपये आधारभूत किंमत देते; पण अनेक दूध उत्पादक संस्थांना गेले वर्षभर सरकारची आधारभूत किंमत मिळालेलीच नाही, असे राणे म्हणाले. या वेळी पशुसंवर्धन खात्याचे मंत्री पार्सेकर उभे राहिले. आपण अलीकडेच अनेक दूध उत्पादक सहकारी संस्थांची बैठक घेतली. काही संस्थांना नऊ महिन्यांचे, तर काही संस्थांना एक वर्षाचे देणे सरकारकडे अडले आहे; कारण काही संस्था सरकारकडे नीट कागदपत्रे पाठवत नाहीत. नीट माहिती आली नाही की मग सगळी कागदपत्रे वगैरे परत संस्थेकडे पाठविली जातात. आता नीट कागदपत्रे आली नाही, तरी बिले व कागदपत्रे परत पाठवू नका, संस्थेच्या चेअरमनला बोलावून विषय निकालात काढा, अशी सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले. आपल्या सांगे मतदारसंघातही एक वर्ष झाले, तरी दूध उत्पादकांना आधारभूत किंमत मिळालेली नाही, असे आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले. (खास प्रतिनिधी)
दूध उत्पादकांची थकित रक्कम आठवडाभरात!
By admin | Updated: August 5, 2014 01:48 IST