लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : गोवा हे लहान राज्य आहे. गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प होऊच शकत नाही. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याचा विपर्यास काँग्रेस करीत आहे. राज्यात अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
केंद्रीय मंत्री खट्टर यांनी फक्त पर्यायी विजेबाबत फक्त सूचना केली होती, असे ते म्हणाले. म्हापसा येथे काल, मंगळवारी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, मंडळ अध्यक्ष योगेश खेडेकर, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, सुशांत हरमलकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पुढील निवडणुकीत पुन्हा भाजपाचे डबल इंजीन सरकार सत्तेवर आणण्यासाठी, देश सुपरपॉवर करण्यासाठी दहशतवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी आतापासून कामाला लागा. काँग्रेस तसेच विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. राज्यात २००७ ते २०१२ या काळात काँग्रेसचे डबल इंजिन सरकार होते. पण त्या पक्षाला त्याचा लाभ उठवता आला नाही. कोणत्याच योजना गोव्यात आणल्या नाहीत. त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यास अपयश आले. मात्र भाजप सरकारने राज्यातील पायाभूत सुविधांवर ३० हजार कोटींहून अधिक निधी खर्च केला आहे.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक नाईक यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विरोधकांकडून होत असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका असे ते म्हणाले. पुढील निवडणुकीनंतर भाजपाच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार तानावडे म्हणाले की, डबल इंजीन सरकारने सर्वांगीण विकास केला आहे. रस्त्यांचे जाळे, पायाभूत सुविधा, फ्लायओव्हर, दोन विमानतळे अशा सुविधा दिल्या आहेत. भाजप पुन्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरा जाईल.
उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आपल्या भाषणातून मेळाव्यातून म्हापशातील कार्यकर्त्यांना नवी स्फुर्ती दिली. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांत नवा जोश आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सलग सहा वर्षे प्रशासन स्थिर व यशस्वीपणे चालवून दाखवले. शहरात बरीच कामे सुरु आहेत. आणखी काही सुरू होणार आहेत. हे डबल इंजीन सरकारामुळेच शक्य झाले. पुढील काही दिवसांत म्हापशात ३१ कोटींची हॉटमिक्सींगची कामे हाती घेतली जाईल. २०४७चे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन आपण काम करतो. म्हापशात पुन्हा कमळ फुलेल.