लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजप व मित्रपक्षांचे मंत्री, आमदार यांची बैठक घेऊन विरोधकांना कसे हाताळायचे याबद्दल रणनीती ठरवली. बैठकीत काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी आमदारांना केल्या. पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत असताना आता सत्ताधाऱ्यांनीही डावपेच आखले आहेत.
आमदार गोविंद गावडे हेही बैठकीत सहभागी झाले होते. अलीकडेच त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याने त्यांची भूमिका विधानसभेत काय असेल? ते सरकारला घेरणार की सरकारच्या बाजूने राहणार याबद्दल उत्कंठा आहे. पत्रकारांनी विचारले असता गावडे यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.
येत्या २१ जुलैपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून पंधरा दिवस प्रत्यक्ष कामकाज चालणार आहे. सत्ताधारी आमदारांनी तसेच मंत्र्यांनी या अधिवेशनात कोणत्या गोष्टी आवर्जून पाळाव्यात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. काय करावे व काय करू नये, याचा पाढाच वाचण्यात आला.
मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर बैठकीस अनुपस्थित राहिल्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, ते काही खासगी कामानिमित्त गोव्याबाहेर आहेत व त्यांनी तसे कळवले होते. अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये व आंतोन वास उपस्थित राहिले.
सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, यापुढे भाजपचा कोणताही मंत्री किंवा आमदार एकमेकांविरुद्ध आरोप करणार नाही किंवा एकमेकांची बदनामी करणार नाही. पक्षशिस्त पाळण्याचे सक्त निर्देश मी सर्वांना दिलेले आहेत.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानसभा अधिवेशनाच्या तयारीसाठीच ही बैठक होती. भाजप विधिमंडळ सदस्य व सरकारमधील घटक पक्ष तसेच सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची मिळून ही बैठक बोलावली होती. विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा झाली. काही धोरणात्मक निर्णय जाहीर केले जाणार आहेत. तसेच खासगी ठराव व खासगी विधेयके सादर करण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत, त्यावर चर्चा झाली.
...म्हणून विधानसभा अधिवेशन पंधरा दिवसांचे
अधिवेशनाचे दिवस कमी केल्याबद्दल विरोधी आमदारांकडून होत असलेल्या टीकेसंबंधी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील तीन दिवसांची चर्चा गेल्या अधिवेशनातच झालेली आहे. त्यामुळे ते तीन दिवस कमी झाले म्हणून अधिवेशन पंधरा दिवसांचे आहे. तर आमदार दिगंबर कामत म्हणाले की, विधानसभा अधिवेशनापूर्वी नेहमीच अशी बैठक होते. या बैठकीत अधिवेशनाबद्दल चर्चा करण्यात आली. आणखी कोणतेही विषय नव्हते.