लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पोर्तुगिजांनी गोव्यातील कदंबकालीन मंदिरे उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी मंदिरांचे पुनर्निर्माण केले. गोवा केवळ 'सन, सॅण्ड अॅण्ड सी' यापुरताच मर्यादित नसून गोव्याची नाळ अध्यात्मानेही जोडलेली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
तिरुपती येथे आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोविंदगिरी महाराज, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदी उपस्थित होते. देशभरातून आलेले संत, महंत तसेच उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, देव व धर्म शाबूत राहिला तरच देश शाबूत राहील. छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य राजे, महाराजांनी देव, धर्म शाबूत ठेवला. भारतात इंग्रज मोघल, पोर्तुगीज, डच यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली. या मंदिरांचं पुनर्निर्माण केले व त्यामुळे मंदिरे शाबूत राहिली. हिंदवी स्वराज्यार्च स्थापना करणारे छत्रपती केवळ महाराष्ट्राचेच नव्हेत तर सर्व देशाचं आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'पोर्तुगिजांनी उदध्वस्त केलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराचे नवनिर्माण करुन लोकार्पण करण्याचे भाग्य मुख्यमंत्री म्हणून मला लाभले. गोव्याच्या भूमीत देवी शांतादुर्गा, देवी सातेरीला पुजले जाते तसेच निसर्गाचीही पुजा केली जाते. २०२३ साली वाराणसी येथे आयोजित केलेल्या पहिल्या मंदिर संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदा तिरुपती येथे आयोजित केलेले हे दुसरे पर्व आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'आमची नाळ मंदिर संस्कृतीशी जोडली गेली आहे. आम्ही सर्व एकजुटीने राहिलो तरच सुरक्षित राहू. आमची भाषा, वेश वेगळा असला तरी आम्ही सर्व एक आहोत.
गोमातेच्या रक्षणासाठी आम्ही बांधिल
मुख्यमंत्री म्हणाले की, आज प्रयागराजला महाकुंभमेळा होत आहे तर तिरुपतीला जगातील सर्वात मोठे मंदिर प्रशासन व व्यवस्थापन यासाठी समर्पित असलेली ही आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद म्हणजे मंदिरांचा भक्तिमय महाकुंभच आहे. मी परशुराम भूमीतून येतो आहे. आमचे सरकार गोमाता संरक्षणासाठी बांधिल आहे. सरकार शेतकऱ्याला गोमाता देखभालीसाठी प्रत्येक गाईमागे दिवशी ८० रुपये देतो. गोव्यातही सनातन हिंदू धर्म आहे.