लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'विकसित भारत २०४७' ची दूरदर्शी योजना तयार करीत आहे. ही योजना पुढील पिढी समोर नेताना भावी पिढीला अधिक सक्षम करण्यासाठी त्यांना देव, धर्म व देश यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.
कल्याण आश्रम गोवातर्फे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या ७४ व्या स्थापना दिन कार्यक्रम पाटो- पणजी येथील संस्कृती भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळे ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की कल्याण आश्रमाच्या कार्याला ७० हून अधिक वर्ष पूर्ण झाली. मात्र, अजूनही ते त्याच चिकाटीने काम करीत आहेत. याचे खरेच कौतुक आहे. प्रत्येकाने अशा कार्याला हातभार लावावा. विकसित भारताच्या माध्यमातून भावी पिढीला सक्षम करावे.
कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की दुसऱ्यांमध्ये चांगले आचार व विचार प्रदान करणे हे फार महत्वाचे असते. नकारात्मक विचार तसेच नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहावे. चांगल्या विचारांचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम करीत आहेत. महत्वाचे म्हणे त्यांची नेपाळ येथेही शाखा आहे. राष्ट्र घडणीत तसेच देशाला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत अशा संस्थांचे योगदान महत्वाचे ठरते. या संस्था समाज सेवा करण्याचे महत्वाचे काम करतात. वनवासी कल्याण आश्रमचे सहसंघटनमंत्री भगवान सहाय म्हणाले, की कल्याण आश्रम एक सामाजिक संस्था आहे व समाज कार्य करते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाचे संघचालक राजेंद्र भोबे, कल्याण आश्रम गोवाचे अध्यक्ष डॉ. वेंकू गावडे उपस्थित होते.