पणजी : शिक्षकदिनाला गुरु उत्सव नव्हे, तर मोदी उत्सवाचेच रूप मिळाल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांतही तीव्र नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीव्हीवरील भाषण मुलांना ऐकविण्याची सक्ती शिक्षण खात्याकडून केल्याने शुक्रवारी शिक्षकदिनी विद्यालयांच्या कार्यक्रमांचे नियोजन कोलमडले आहे. शिक्षकदिनी शिक्षकांमध्ये प्रथमच नाराजी आहे. शिक्षण खात्याकडून फतवा आल्याने राज्यातील १७९० विद्यालयांपैकी १७५६ विद्यालयांनी मोदी यांचे भाषण मुलांना ऐकविण्यासाठी दूरदर्शन संचाची वगैरे व्यवस्था केली आहे. मुलांना शिक्षकदिनी पूर्णवेळ विद्यालयात राहावे लागणार असल्यानेही पालकांतही तीव्र नाराजी आहे. शिक्षकदिन हा शिक्षकांच्या सन्मानाचा असतो. तिथे शिक्षकांना महत्त्व यायला हवे. त्याऐवजी केंद्राकडून फतवा आल्याने त्याचे निमुट पालन करताना शिक्षण खात्याने या दिनास मोदी उत्सवाचे रूप दिले आहे. केवळ मोदी यांचे भाषण मुलांना ऐकविण्याचा सोपस्कार पार पाडला जावा यावरच खात्याने भर दिला आहे. यामुळे विद्यालयांनी शिक्षकदिनी जे कार्यक्रम नियोजित केले होते, ते अडचणीत आले आहेत. सकाळच्यावेळी कसेबसे शिक्षकदिनाचे कार्यक्रम करायचे व दुपारनंतर सायंकाळपर्यंत टीव्हीच्या संचासमोर शेकडो विद्यार्थ्यांना उभे करून मोदींचे भाषण ऐकण्यास भाग पाडायचे, असे ठरले आहे. राज्यातील बहुतांश विद्यालयांकडे सुस्थितीतील टीव्ही संच नाहीत, कुठून तरी ते आता मिळविले गेले आहेत. प्रत्येक हायस्कूलकडे चारशे-पाचशे मुले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मुलांना एकाच टीव्ही संचासमोर बसविणे अनेक हायस्कूलना भाग आहे; कारण बहुतांश विद्यालयाजवळ प्रोजेक्टर्स नाहीत. सकाळी शिक्षकदिनाचे कार्यक्रम करून सायंकाळी मोदींचे भाषण ऐकण्यासाठी पुन्हा विद्यालयात उपस्थित राहणे, असे प्रथमच घडत असल्याने शिक्षक व विद्यार्थी नाराज आहेत. आम्हालाच दोन-अडीच तास भाषण ऐकण्याएवढी सहनशीलता नाही, तिथे मुलांचे काय होईल त्याची कल्पनाच केलेली बरी, असे काही शिक्षकांनी बोलून दाखवले. (खास प्रतिनिधी)
शिक्षकदिन की ‘मोदीदिन?’
By admin | Updated: September 6, 2014 01:25 IST