गोवापोलिसांचे अभिनंदन करावेच लागेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या गृह खात्याचेही कौतुक होणे गरजेचे आहे. सुलेमान खानला अखेर पोलिसांनी केरळमध्ये पकडले. जमीन हडप प्रकरणातील हा मास्टरमाइंड क्राइम ब्रँचच्या कोठडीतून १३ डिसेंबरला पळाला होता. गोवा पोलिसांची त्यामुळे नाचक्की झाली होती. मुख्यमंत्री सावंत विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले होते. ज्याला मोठा गुन्हेगार म्हटले जाते, त्याला केवळ अमित नाईक नावाच्या एका आयआरबी पोलिसाच्या देखरेखीखाली ठेवले गेले होते. खरे म्हणजे त्या पोलिस शिपायाने सुलेमानवर लक्ष ठेवले नाही, तर सुलेमाननेच त्या पोलिसावर लक्ष ठेवून मैत्री केली. पोलिसाच्याच दुचाकीवर बसून सुलेमान आरामात कर्नाटकातील हुबळीपर्यंत गेला होता. एका कुविख्यात गुन्हेगारास पोलिसच दुचाकीवर बसवून शेजारील राज्यात सोडून येतो, ही घटना संपूर्ण राज्यासाठीही लज्जास्पद ठरली होती. लोकांनी याप्रश्नी भाजप सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.
सुलेमानच्या पलायनानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्या चेहऱ्यावरील टेन्शन गोमंतकीयांना स्पष्ट दिसत होते. सुलेमानने आरामात व्हिडीओ काढून पहिल्यांदा जेव्हा हा जोशुआवर आणि पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप केले, तेव्हा तर गृहखात्याचा रक्तदाब आणखी वाढला होता. मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री कसेबसे वेळ मारून न्यायचे. मात्र, सुलेमानला गोवा पोलिस पकडतीलच असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला होता. तो खरा ठरला. यामुळेच मुख्यमंत्री सावंत यांच्याही प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. अर्थात सुलेमान पुन्हा पळून जाऊ नये म्हणून पोलिसांना आता खूप काळजी घ्यावी लागेल. सुलेमानवर कायम पहारा ठेवावा लागेल.
सुलेमान म्हणजे कुणी विरप्पन किंवा शोलेतील गब्बरसिंग नव्हे. तसेच सुलेमान म्हणजे कुणी मामुली आरोपीदेखील नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. देशात विविध ठिकाणी सुलेमानविरुद्ध गुन्हे आहेत. खुनाचाही गुन्हा नोंद आहे. आपण कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही याची कल्पना असल्याने सुलेमान पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्नही करू शकतो. पोलिसांनी अटक केल्यानंतर अमित नाईकने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुलेमानदेखील तीच वाट धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून सुलेमानवर लक्ष ठेवावे लागेल. शेवटी जमीन हडप प्रकरण साधेसुधे नाही. सुलेमानचे पाठीराखे गोव्यातच असतील.
काही दिवसांपूर्वी बार्देशमधील एका जमिनीचे सेलडीड व्हायरल झाले होते. त्यात कळून येऊ शकते. सुलेमान अनेक वर्षे गोव्यात होता. त्याचे अनेकांशी लागेबांधे तयार झालेत. कुणी घरी बसून जमीन हडप करू शकत नाही. शासकीय यंत्रणेतील काहींचे सहकार्य मिळते तेव्हा त्या जमिनींची नोंदणी व अन्य व्यवहार सुलभ होतात. गोव्यात नोकरीकांडही सहज घडले नव्हते, हे येथे लक्षात घ्यावे लागेल.
सुलेमानने काल सोमवारी पुन्हा एक व्हिडीओ जारी केला. त्यात त्याने वकील अमित पालेकर यांच्यावरही आरोप केला आहे. अर्थात त्या आरोपाची चौकशी पोलिस करत आहेतच. सत्य काय हे लगेच कळणार नाही, मात्र सुलेमान पकडला गेल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता सुलेमानकडून हवी ती माहिती पोलिस मिळवू शकतील. सुलेमानने प्रथम व्हिडीओ काढला तेव्हा त्याने आपला छळ झाला, असे म्हटले होते. प्रकरण सीबीआयकडे सोपवा अशीही मागणी त्याने केली होती. सुलेमान अशा उलटसुलट मागण्या यापुढेदेखील करू शकतो.
सुलेमानने बनावट कागदपत्रे तयार करून आजवर गोव्यात बऱ्याच जमिनी हडप केल्या आहेत. काल त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली. सुलेमानचे पलायन हा गोव्यात राजकीय आखाड्याचा विषय बनला होता. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हा विषय विरोधक व सत्ताधाऱ्यांकडून वापरला जात होता. सुलेमानचे कोठडीतून पलायन हे पोलिस सुरक्षिततेतील कमकुवतपणामुळे घडले असे जाहीर करणे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनादेखील भाग पडले होते. मात्र, एकूण ७० पोलिसांनी मिळून सुलेमानचा शोध लावण्यासाठी बराच घाम गाळला. शेवटी हा तथाकथित डॉन सापडला. सुलेमान को पकडना मुमकीन है हे पोलिसांनी दाखवून दिले.