लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अट्टल गुन्हेगार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान हा गोवापोलिसांच्या अटकेतून पळून गेला होता तेव्हा त्याने एर्नाकुलम-केरळ येथे आसरा घेतला होता. त्याचा हा आसरा साधासुधा नव्हता, तर त्याने एक आलिशान घर भाड्याने घेतले होते. त्यासाठी त्याने दरमहा ७५ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते.
अमाप संपत्ती मिळवून ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठीच कदाचित काही लोक गुन्हेगारीचा मार्ग पत्करत असावेत. देशभर गुन्हेगारी प्रकरणे नोंद असलेल्या सुलेमाननेही अमाप पैसा गोळा केला आहे. त्यामुळेच गोव्यातून निसटल्यावर तो केरळात गेला आणि एर्नाकुलम येथे जाऊन एक घर भाड्याने घेतले. हे घर इतके आलिशान होते की, त्याचे महिन्याचे भाडे होते ७५ हजार रुपये, म्हणजेच वर्षाला ९ लाख रुपये.
ज्यावेळी तुरुंगातून पळून जाण्याचा बेत सुलेमानने आखला त्याचवेळी त्याने कुठे राहणार याचेही नियोजन केले होते. त्यामुळे आपल्या मुलांना आणि पत्नीला एर्नाकुलम येथे पोहोचण्यास सांगितले होते. तिथे भाड्याच्या घरात राहून त्याची पत्नी अफसाना खान सुलेमानच्या येण्याची प्रतीक्षा करीत होती.
कारवार येथील चार फ्लॅटशिवायही त्याच्याकडे अमाप मालमत्ता व पैसा आहे. सुलेमानने इतरांच्या नावाने १६ बँक खाती खोलली आहेत. या खातेदार म्हणजे त्याच्या प्रेयसी आहेत. पुरुषांच्या नावे खाती खोलून पैसे जमा करण्याऐवजी महिलांच्या नावे खाती खोलून पैसे जमा करणे त्याला अधिक सोयीस्कर वाटते. पोलिस चौकशीदरम्यानही त्याने याची कबुली दिली.
अंदाज ठरला खरा...
वास्तविक सुलेमानला घरांची काही कमी नव्हती. कारवारला त्याचे ४ फ्लॅट आहेत. तिथे त्याची एक बांधकाम कंपनी आहे. त्या कंपनीच्या नावे हे फ्लॅट आहेत. परंतु, तिथे राहण्याची जोखीम त्याने घेतली नाही. कारण तिथे गोवा पोलिस केव्हाही पोहोचू शकतात याची त्याला कल्पना होती आणि झालेही नेमके तसेच. गुन्हे शाखेच्या उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक कारवारला त्याच्या फ्लॅट्सवर येऊन थडकलेच.
पोलिस तयारीतच गेलेले
जेव्हा केरळ पोलिसांसह गोवा पोलिसांची टीम त्याच्या एर्नाकुलम येथील घरापर्यंत पोहोचली तेव्हा मात्र त्याला धक्काच बसला. कारण पोलिस तिथे पोहोचतील अशी त्याने कल्पनाही केली नव्हती. तसेच आपल्याबरोबर आपल्या पत्नीलाही अटक करतील, असेही त्याला वाटले नव्हते; परंतु गोवा पोलिस पूर्ण तयारीनिशी गेले होते. जाताना महिला पोलिस कॉन्स्टेबलनाही घेऊन गेले होते.