लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसने तिकिटाची ऑफर दिली तरीही मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे आपचे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी स्पष्टपणे सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, मी बदल घडवून आणण्यासाठीच राजकारणात आलो आहे. मी जे काही कृत्य करणार ते इतिहासात कायम राहील. २०२७ ची विधानसभा निवडणूक राज्यातील विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या बॅनरखाली लढणार का?, असा प्रश्न केला असता वेंझी म्हणाले की, आम्ही युतीने लढलो नाही तर जिंकू शकणार नाही. समाजात पत असलेले नवीन चेहरे उमेदवार म्हणून द्यावेत. दिल्लीत आपचा दारुण पराभव झाल्याचे मान्य करायला मी तयार नाही. आम्हाला ४४ टक्के मते मिळालेली आहेत. गोव्यात पुढील विधानसभा निवडणूक युतीनेच लढायला हवी. नवे चेहरे आताच शोधल्यास त्यांना पुढील दोन वर्षे काम करता येईल.
काँग्रेसवर निशाणा
गोव्यातील जनतेला २०२७ च्या निवडणुकीत विरोधी पक्षांची युती हवीय. मात्र काँग्रेसला युती नकोय, काँग्रेसचा एकेक नेता तसेच त्यांचे गटाध्यक्ष वगैरे आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे जाहीर करतात. दिल्लीतही काँग्रेसने हेच केले. त्यांची केवळ ४ टक्के मते असतानाही स्वतंत्र लढून सत्तेची स्वप्ने पाहिली, असेही व्हिएगश म्हणाले.