लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : जनतेशी सातत्याने संपर्कात राहणे आवडते. त्यातून आपली ऊर्जा वाढते. राज्याच्या कानाकोपऱ्यात सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रांतील परिस्थिती जाणून घेण्यासाठी लोकांशी भेटून संवाद साधावा लागतो. त्यामुळे लोकांना न्याय देण्यासाठी जनता दरबार निश्चितच उपयुक्त ठरतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात आठवडाभर व्यस्त राहिल्यानंतरही मुख्यमंत्री सावंत शनिवारी साखळीतील जनता दरबारात उपस्थित होते. त्यांनी शेकडो लोकांबरोबर संवाद साधून समस्याही जाणून घेतल्या. १६ ते १८ तास काम करण्याची क्षमता ठेवत मुख्यमंत्री सातत्याने व्यग्र असल्याचे कार्यक्रमातून दिसून येते. आठवडाभर चाललेल्या विधानसभा अधिवेशनात अनेक प्रश्नांना सामोरे जाताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप ठेऊन अधिवेशनात सक्रिय सहभाग दाखविला. शनिवारी सकाळी ९ वाजण्यापूर्वीच मुख्यमंत्री जनता दरबारासाठी रवींद्र भवनात उपस्थित होते.
सुमारे दीड तास लोकांना भेटून ते त्यांचे प्रश्न समजून घेत होते. नोकरी, सामाजिक प्रश्न, घरगुती समस्या, विविध योजनांची पूर्तता, तसेच अॅडमिशन व कार्यकर्त्याचे प्रश्न यांसह अनेक समस्या मुख्यमंत्री सातत्याने जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देताना दिसत होते.त्याच दिवशी सायंकाळी आलेल्या अर्जाची छाननी करून संबंधित खात्यांच्या माध्यमातून कामे तातडीने करण्यासाठी कर्मचारी सतत पाठपुरावा करतात.
अनेक वेळा मुख्यमंत्री स्वतः फोन करून त्यावर लक्ष ठेवतात. यामुळे खऱ्या अर्थाने जनतेचा दरबार लोकाभिमुख आणि परिणामकारक ठरला आहे. गेल्या दोन वर्षाच्या जनता दरबाराचा आढावा घेतल्यास तातडीने प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्र्यांनी चांगले यश मिळविलेले दिसते. शनिवारी मुख्यमंत्र्यांना नवीन राज्यपालांच्या शपथविधीसाठी राजभवनात जायचे असल्याने त्यांनी सकाळीच कार्यकर्ते आणि जनतेची भेट घेण्यासाठी जनता दरबारात हजेरी लावली.
आमदार न्याय देण्यासाठी प्रयत्नशील
मुख्यमंत्री म्हणाले, की खोटी आश्वासने द्यायला आवडत नसले तरी जे शक्य आहे, त्याबाबत तातडीने शब्द देऊन त्याचा पाठपुरावा केला जातो. विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांचा अभ्यास योग्य प्रकारे होणे आवश्यक असते. या दृष्टीने सर्व आमदार प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.