पणजी : काँग्रेसश्रेष्ठींना कोणत्याही कारणास्तव आपल्यावर कारवाई करावीशी वाटत असेल तर त्यांनी ती अवश्य करावी, असे उघड आव्हान आमदार माविन गुदिन्हो यांनी दिले आहे. पक्षाशी असहकार पुकारल्याबद्दल माविन, तसेच सांताक्रु झचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर कारवाईच्या हालचाली काँग्रेसमध्ये उच्च पातळीवर चालल्या आहेत. पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची जी शक्यता वर्तविली जात आहे, त्याबाबत माविन यांना बोलते केले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. कारवाईस पक्ष मोकळा असल्याचे ते म्हणाले. मार्च २०१२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी गुदिन्हो दाबोळी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या माविननी पक्षाशी उघडपणे असहकार पुकारला आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्यासाठी काम न करता उलट भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर यांनाच अधिकाधिक कशी मते मिळतील, हे पाहिले. पक्षश्रेष्ठींनी विरोधी पक्षनेतेपद डावलल्याने त्यांनी भाजपकडे सलगी केलेली आहे. सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसी उमेदवाराकरिता काम न करण्याचा पवित्रा घेऊन थेट पक्ष निरीक्षकांनाही आव्हान दिलेले आहे. काम करणार तर नाहीच, उलट फुर्तादो यांचा पराभव व्हावा म्हणूनच प्रयत्न करीन, असे त्यांनी सुनावल्याने त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु रात्री उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला नाही (प्रतिनिधी)
श्रेष्ठींनी कारवाई करावीच : माविन
By admin | Updated: February 9, 2015 01:11 IST