पणजी : सेवेत कायम करण्याच्या मागणीला सरकारने चुना लावल्याने निषेध करीत सुरक्षा रक्षकांनी बुधवारी येथील मनुष्यबळ विकास महामंडळ कार्यालयावर धडक दिली. सकाळी १0.३0 वाजता जमलेल्या सुमारे शंभर सुरक्षा रक्षकांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत शिक्षण खात्याच्या जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर महामंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. आंदोलक गुरुवारी सकाळी १0 वाजता आझाद मैदानावर जमणार असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने उपसभापती अनंत शेट यांनी सर्व सोसायटीअंतर्गत कार्यरत सर्व सुरक्षा रक्षकांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन द्यावे, तसेच या प्रश्नावर कामगार संघटना आणि सरकार यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन द्यावे, अशी आंदोलकांची मागणी होती; परंतु शेट हे काही दिवसभरात कार्यालयात फिरकलेच नाहीत. पाच जणांचे शिष्टमंडळ विधानसभा संकुलात आपल्या कार्यालयात चर्चेसाठी पाठवा, असा संदेश त्यांनी पाठविला. सुरुवातीला आंदोलकांनी हा प्रस्ताव फेटाळला; परंतु सायंकाळी संघटनेचे सचिव शाबी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली पाचजणांचे शिष्टमंडळ पर्वरीला गेले. मात्र, शेट यांनी कोणतेही लेखी निवेदन देण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांकडे बोलल्याशिवाय आपण लेखी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. आंदोलकांचे नेतृत्व करणारे अॅड. अजितसिंह राणे यांनी सरकार शब्द पाळण्यास तयार नसल्याने हे आंदोलन आता व्यापक स्वरूपाचे बनवून जनआंदोलन करू, असा इशारा दिला आहे. दिवसभर ठिय्या मांडून सायंकाळी ७ वाजता आंदोलक घरी गेले. (प्रतिनिधी)
सुरक्षा रक्षक पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Updated: February 5, 2015 01:38 IST