कुंभारजुवे : बेतकी-खांडोळा पंचायतीत सरपंच व उपसरपंच पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहेत. विशेषत: घरांच्या बांधकामासंदर्भातील कामांचा जास्त खोळबा झाला आहे. सरपंच भावना नाईक व उपसरपंच अरविंद गावकर यांच्या विरोधात विरोधी गटाने दाखल केलेल्या अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यामुळे त्यांना पद सोडावे लागले. दरम्यान, नवा सरपंच व उपसरपंच निवडण्यासाठी गट विगास कार्यालयाने सोमवार दि. ४ रोजी पंचायत मंडळाची बैठक बोलावल्याचे वृत्त आहे. सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्यामुळे निवडून आलेल्या ४ महिला सदस्यांपैकी बेतकी प्रभागातून निवडून आलेल्या श्रीनिशा नाईक सरपंच होण्याची दाट शक्यता असून प्रकाश शेट यांचे नाव उपसरपंचपदासाठी घेतले जात आहे. दरम्यान अनेकांचे घर बांधणीचे प्रस्ताव परवान्यासाठी पंचायत कार्यालयात पडून आहेत. शिवाय इतर दाखल्यांसाठी तसेच पावसापूर्वीच्या कामांना सुरुवात करण्यासाठी सरपंच, उपसरपंच नसल्यामुळे अडचण होत आहे. तसेच खांडोळा गाव आज सर्व बाजूंनी विस्तारत असल्यामुळे अनेक समस्याही निर्माण होत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी व पंचायत क्षेत्राचा विकास साधण्यासाठी स्थिर पंचायतीची गरज आहे, असा नागरिकांचा दावा आहे. (प्रतिनिधी)
सरपंच, उपसरपंचाविना ग्रामस्थांच्या कामाचा खोळंबा
By admin | Updated: May 3, 2014 14:22 IST