पणजी : विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्यात दिलजमाई होणे आता जवळजवळ अशक्य बनले आहे. काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांना याची पूर्ण कल्पना आली असून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सिंग करत आहेत. दिलजमाई घडवून आणण्यासाठी येत्या महिन्यात दिग्विजय सिंग गोव्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेस हाउसमध्ये येऊन एका खाण व्यावसायिकाने राणे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर राणे यांनी दिग्विजय सिंग व इतरांना काही गोष्टी सांगितल्या आहेत. राणे यांनी काँग्रेसच्या सगळ्याच बैठकांपासून व सोहळ्यांपासून तूर्त दूर राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. फर्नांडिस हे प्रदेशाध्यक्षपदी असेपर्यंत आपल्याला काँग्रेस पक्ष संघटनेच्या बैठकांमध्ये भाग घेण्यात रस नाही, असा संदेश राणे यांनी दिग्विजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचविला असल्याची चर्चा पक्षाच्या आतील गोटात सुरू आहे. स्वत: राणे यांनी मात्र याविषयी कोणतेच भाष्य केलेले नाही. दुसऱ्या बाजूने जॉन यांनी सावध भूमिका घेतली आहे. आपले व राणे यांच्यात मतभेद नाहीतच, असे फर्नांडिस यांनी दिग्विजय सिंग यांना सांगितले आहे. राणे यांच्यावर लाचखोरीचा आरोप ज्यांनी केला, त्यांना अशा प्रकारचा आरोप करू नका, असे आपण सांगितले होते, असे फर्नांडिस यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, दिग्विजय सिंग तसेच सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांनाही राणे-फर्नांडिस मतभेदांची कल्पना आली आहे. फर्नांडिस यांच्या जागी लुईझिन फालेरो किंवा पांडुरंग मडकईकर यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून आणण्याचा प्रयत्नही काहीजणांनी करून पाहिला. तथापि, दिग्विजय सिंग हे ठामपणे फर्नांडिस यांच्या पाठीशी राहिले आहेत. मडकईकर यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यात रस नाही, असेसांगितले आहे. (खास प्रतिनिधी)
राणे-जॉन दिलजमाई अशक्य
By admin | Updated: July 18, 2014 02:05 IST