पणजी : गोव्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध भागात पाऊस पडू लागला आहे. पावसाळ्यात समुद्रातील कचरा व अन्य बरीच घाण किनाऱ्यावर वाहून येते. यावेळीही हळूहळू ही घाण किनारपट्टीवर येऊ लागली आहे. पावसाचे प्रमाण जसजसे वाढेल तसतशी जास्त घाण दिसून येईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. पाऊस सुरू होताच गोव्याच्या समुद्राचे निळे आकर्षक पाणी काही ठिकाणी लाल झाल्याचे शुक्रवारी दिसून आले.गोव्याला 105 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. पावसाळा सुरू होताच देश-विदेशी पर्यटकांनी गोव्याचा निरोप घेतला आहे. गोव्याच्या किनाऱ्यांवर पावसाळ्य़ात जास्त संख्येने पर्यटक फिरत नाहीत. समुद्रही खवळलेला असतो. काही दिवसांपूर्वी कोलवा येथे समुद्रातील बरीच घाण बाहेर आलेली लोकांनी पाहिली. किनारपट्टीतील अनेक हॉटेल्स आपले सांडपाणी व अन्य घाण समुद्रात सोडपात. अशा प्रकारे सागरी प्रदूषण करण्याची हॉटेलांना मान्यता नसते पण त्यांच्याकडून हे प्रकार केले जातात. पाऊस पडू लागला की, ही घाण किनाऱ्यांवर येऊन पसरते. बरेच प्लॅस्टीक पिशव्या व प्लॅस्टीक बाटल्या, टायरचे मोठे तुकडे, ओंडके, थर्माकोल, पालापाचोळा, मच्छीमारांची तुटलेली जाळी हे सगळे किना:यांवर वाहून येते. आताही काही किनाऱ्यांवर असा कचरा येणे सुरू झाले आहे. तूर्त प्रमाण मर्यादित आहे. मात्र या कच:यामुळे किनारे बकाल बनतात. जे किनारे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे, तेथील स्वच्छता लवकर होते पण काही किनारे दुर्लक्षित राहिलेले आहेत. काही ठिकाणी पर्यटक चिप्स वगैरे खाऊन प्लॅस्टीकच्या छोटय़ा पिशव्या तिथेच टाकतात. काही किनाऱ्यांवर पावसाळ्य़ात तेलतवंग व्यापून राहतात. तेलाचे गोळे पसरतात.संस्थेचे निरीक्षण भारतातील सर्व किनाऱ्यांची पाहणी केल्यानंतर गोव्यातील किनाऱ्यांवर प्लॅस्टीकचा कचरा जास्त आढळून येतो, असे निरीक्षण कोची येथील सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च संस्थेने (सीएमएफआरआय) नोंदविले आहे. देशातील अकरा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 255 किनाऱ्यांचा ह्या संस्थेच्या पथकाने अभ्यास केला. यात गोव्यातील बारा किनाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक मीटरवर किना:यावरील वाळूमध्ये 25.47 ग्रॅम प्लॅस्टीक आढळते, असा दावा ह्या संस्थेने केला आहे. गोव्यानंतर कर्नाटकमध्ये किना:यांवर प्लॅस्टीकचे प्रदूषण जास्त आढळून आले. त्यानंतर गुजरातमध्येही किना:यांवर प्लॅस्टीक प्रदूषण आढळून आले. दरम्यान, गोव्यात साळगाव येथे आधुनिक असा कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. किनाऱ्यांवरील कचरा ह्या प्रकल्पात आणून प्रक्रिया केली जाते. काहीवेळा तुटलेले सोफा, गाद्या, खाटा व अन्य तत्सम कचराही व्यवसायिक किना:यांवर टाकून देतात व अशा प्रकारचा कचरा देखील ह्या प्रकल्पात येतो, असे सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पावसाळ्यात समुद्रातील घाण गोव्याच्या किनाऱ्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:06 IST