पणजी : पावसाने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावल्याने लोकांची तारांबळ उडाली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने सूर्यदर्शन झाले नाही. शनिवारीही पावसाळी वातावरण राहणार असून त्यानंतर पर्जन्यवृष्टी कमी होईल आणि दहा ते बारा दिवसांनी मान्सून माघारी फिरेल, असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. साहाय्यक शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अरबी समुद्रात हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो गोव्याकडे स्थिरावल्याने दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकत असून कोकण व दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार सुरू आहे. गोव्यात रविवारपासून पावसाचा जोर कमी होईल. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल विचारले असता हरिदासन यांनी अशी माहिती दिली की, सध्या जी पर्जन्यवृष्टी होत आहे ती हवामानातील बदलामुळे असून मान्सून अद्याप माघारी फिरलेला नाही. हा पाऊस होऊन गेल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी मान्सूनची माघार सुरू होईल. गुरुवारी दुपारनंतर आकाशात ढग गोळा होऊन गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारीही दुपारपर्यंत पावसाचा जोर होता. (प्रतिनिधी)
पावसाचा जोर कायम
By admin | Updated: October 3, 2015 03:36 IST