पणजी : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी अचानक पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाला भेट दिली आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या केबिनमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचे सध्याचे आरोग्य व तब्येत याविषयी विचारपूस केली. राहुल गांधी हे अशा प्रकारचे पर्रीकर यांच्या केबिनमध्ये प्रथमच पोहोचले. गोवा विधानसभेचे अधिवेशन मंगळवारी सकाळी सुरू झाले. राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणाने कामकाजाला आरंभ झाला.अभिभाषणानंतर दुपारी बारा वाजण्यापूर्वीच कामकाज थांबले. त्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर विधानसभा प्रकल्पातील स्वत:च्या केबिनमध्ये गेले. पंधरा मिनिटांनंतर राहुल गांधी यांचे कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये विधानसभा प्रकल्पाच्या ठिकाणी आगमन झाले. राहुल गांधी गेल्या शनिवारपासून गोव्यात आहेत. आपली आई सोनिया गांधी यांच्यासोबत गांधी गोव्यात खासगी भेटीवर आलेले आहेत. त्यांनी यापूर्वी कधीच गोव्याच्या विधानसभा प्रकल्पाला भेट दिली नव्हती. ते येथे येऊन पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करतील याची कल्पना अगोदर जास्त कुणालाच नव्हती. गांधी यांचे आगमन होण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर चर्चा पसरली. विधानसभा प्रकल्पाच्या मुख्य दाराकडे सगळे थांबले होते, पण राहुल गांधी हे विधानसभा प्रकल्पाच्या मागील दाराने आत आले. उपसभापती मायकल लोबो यांनी गांधी यांचे स्वागत केले.आत येताना व बाहेर जाताना राहुल गांधी प्रसार माध्यमांशी काही बोलले नाही. त्यांनी फक्त हास्य केले. विधानसभा प्ररल्पात पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री पर्रीकर यांचे केबिन आहे. केबिनमध्ये जाऊन गांधी यांनी पाच मिनिटे पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. पर्रीकर अतिशय थकलेले असून त्यांना दोन व्यक्तींच्या हाताला धरूनच सभागृहात प्रवेश करावा लागतो हे सर्व आमदारांनी मंगळवारी पाहिले. तुम्ही आजारी असतानाही कसे कायम काम करता असे राहुल गांधी यांनी विचारले. त्यावर आपला स्वभावच तसा आहे व त्यानुसार आपण काम करतो, असे पर्रीकर यांनी सांगितल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली व काँग्रेसच्या आमदारांनाही भेटावे, अशी विनंती केली. त्यानुसार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाच्या लॉबीमध्ये सर्व काँग्रेस आमदारांची भेट घेतली. राजकीय भेटीसाठी आपण येत्या महिन्यात गोव्यात येईन, असे गांधी यांनी सांगितले व ते दक्षिण गोव्यातील हॉटेलमध्ये परतले. तिथेच त्यांचा तूर्त निवास आहे.
राहुल गांधी पर्रीकरांना भेटले, तब्येतीची केली विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 1:52 PM