लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर गुरूवारी करंजाळे येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ काल, शुक्रवारी पणजीत आंदोलन करण्यात आले. हल्ल्याचा मास्टरमाईंड पसार असून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याने पणजीत चक्काजाम झाला. दोन दिवसांत मुख्य सूत्रधारास अटक न केल्यास सोमवारी गोवा बंदचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली असून संशयितांची संख्या सातवर पोहोचली आहे.
आंदोलनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्ल्स फेरेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस, गिरीश चोडणकर, आपचे आमदार वेन्झी व्हिएगस, वेंझी व्हिएगश, आपचे अमित पालेकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, दुर्गादास कामत व आरजीचे आमदार विरेश बोरकर, अध्यक्ष मनोज परब, मांद्रेचे काँग्रेस गटाध्यक्ष नारायण रेडकर यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुरुवातीला आझाद मैदानावर एकत्र येत आंदोलकांनी हल्ल्याचा निषेध केला. त्यानंतर पोलिस मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलनकर्ते तसेच काही नेते जखमी झाले. यावेळी आमदार वेंझी व्हिएगस व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपल्यावरही लाठ्या चालवल्याचा आरोप केला. यानंतर चवताळलेल्या आंदोलनकर्त्यांनी भाजप कार्यालयाकडे कूच केली, पण तिथेही गेट बंद असल्याने प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी भाजपविरोधात नारे देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानाकडे वळविला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना चर्च चौकात अडविले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच अन्य नेत्यांनी जुन्या सचिवालयाकडे मोर्चा वळवला. यावेळी डी. बी बांदोडकर हा मुख्य रस्ता काही वेळ आंदोलकांनी बंद केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुपारची वेळ असल्याने भर उन्हात लोकांना उभे राहावे लागले. यावेळी पोलिस अधीक्षकांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नंतर आंदोलकांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर वळविला.
आणखी दोघाजणांना अटक
काणकोणकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. फ्रँको ख्रिस्तोफर डिकॉस्टा (वय २८, रा. सांताक्रूझ) व साईराज संजय गोवेकर (वय २८, रा पिळर्ण-बार्देश) अशी त्यांची नावे आहेत. फ्राँको याला सांताक्रूझ तर साईराज याला म्हापसा बाजारपेठ परिसरातून अटक करण्यात आली.
हल्ल्याच्या हेतूचा तपास : डीजीपी
रामा काणकोणकरवरील हल्ल्याचा हेतू पोलिसांकडून शोधला जात आहे. त्याचा तपास सुरू असल्याचे गोवा पोलिस खात्याने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले. काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यातील प्रकरणात आणखीन दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस त्यादिशेने तपास करीत असून सर्व संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असल्याचे त्यांनी सांगितले.
वैयक्तिक कारणावरून हल्ला
रामा काणकोणकर यांनी संशयितांविषयी सोशल मीडियावरून आक्षेपार्ह विधाने केली होती. त्या रागातूनच काणकोणकरांवर हा हल्ला करण्यात आल्याची कबुली अटकेत असलेल्या संशयितांनी पोलिसांसमोर दिली.
आंदोलकांच्या मागण्या
यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी भेट घेत मुख्य सूत्रधारास अटक करण्याची मागणी केली. जे मारेकरी पकडले आहेत त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करा, तसेच टास्क फोर्स बसवून या प्रकरणी सखोल चौकशी करा, रामा काणकोणकर यांना पोलिस सुरक्षा पुरवा, तसेच हल्लेखोरांना तडीपार करा, अशा मागण्या केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य करत या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
संशयितांना पाच दिवसांची कोठडी
रामा काणकोणकर प्राणघातक हल्लाप्रकरणी पणजी पोलिसांनी अटक केलेल्या अँथनी नडार, फ्रान्सिस नडार, मिंगेल अरावजो, मनीष हडफडकर व सुरेश नाईक या पाचही संशयितांना पणजी जेएमएफसी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या सर्व संशयितांना गुरुवारीच रात्री अटक केली होती.
संशयितांना तडीपार करू : मुख्यमंत्री
गोमेकॉत उपचार घेणारे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी काणकोणकर यांना गोमेकॉत तसेच त्यांच्या निवासस्थानी पोलिस संरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सर्व संशयितांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. तसेच या घटनेचा सखोल तपास करून संशयितांना तडीपार केले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.