पणजी : गोव्यात राजरोस मटका चालविणाऱ्या अकराशे बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या ‘पुढारी’ व ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर पोलिसांनी ८ आॅक्टोबर २०१५ रोजी गुन्हे दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या ३१ आॅगस्ट २०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. गुन्हा अन्वेषण विभागाच्या रायबंदर येथील कार्यालयात हे गुन्हे दाखल झाले आहेत. गोव्यात राजरोस मटका जुगार चालत असतानाही पोलीस कारवाई करत नाहीत. राजकीय पाठबळ आणि हप्तेशाहीमुळे जुगारचालकांना कोणाचेही भय उरलेले नाही. शिवाय, वृत्तपत्रांमधून मटक्याचे आकडे प्रसिद्ध होत असल्याने या जुगाराचा प्रसार वेगाने होण्यास हातभार लागत आहे. मटक्याच्या जुगारामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून तरुण पिढीही यात ओढली जात आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी माहिती हक्क कार्यकर्ते आणि वीज खात्याचे कर्मचारी काशिनाथ शेट्ये (रा. रायबंदर) यांनी उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात एप्रिल २०१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. त्यानुसार ११०० मटका बुकी, ‘कल्याण’, ‘मीलन’, ‘स्टार’ आदी नावांनी मटक्याचे रॅकेट चालविणारे गुजरातमधील मटकाचालक, निनावी राजकारण्यांसह ‘पुढारी’ आणि ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर भा.दं.वि. कलम १०९, १२० (बी), (३४), गोवा-दमण-दीव जुगारविरोधी कायदा कलम ३, ४, ११ (२) १२ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
मटकाचालकांसह ‘पुढारी’,‘तरुण भारत’वर गुन्हा दाखल
By admin | Updated: October 13, 2015 02:52 IST