लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मी नुकताच नागालँडच्या संस्कृती, परंपरेवर आधारित एक सांगीतिक अल्बम तयार केला आहे. निसर्गात जे दडलेले संगीत आहे, ते लोकांसमोर आणणे हा त्याचा हेतू होता. जर मला गोव्यातही असे काही काम करता येईल का याचा विचार करतो आहे. गोमंतकीय लोक संगीतावर आधारित अल्बम नक्कीच निर्मिती करता येईल. संधी मिळाली तर हेदेखील काम मी निश्चित करणार आहे, असे दिग्गज संगीतकार ए. आर. रेहमान यांनी सांगितले.
'इफ्फी'मध्ये रमण रामचंद्र यांनी समन्वय केलेल्या 'लता मंगेशकर मेमोरियल टॉक: म्युझिकल थिएटर इन इंडिया' या विषयावरील मास्टर क्लासदरम्यान ते बोलत होते. लता मंगेशकर या नेहमीच माझ्यासाठी प्रेरणास्रोत ठरल्या आहेत, असेही ते म्हणाले. ए. आर. रेहमान म्हणाले की, 'लता मंगेशकर या केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर संगीत क्षेत्रातील अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी गायलेली गाणी नेहमीच लोकांना आपली वाटली. लोक त्यांच्या आवाजाशी कनेक्ट होतात, यातूनच त्यांची महानता सिद्ध होते. लता मंगेशकर, पी. सुशीला, जानकी जी., चित्राजी यांना ऐकूनच आम्ही मोठे झालो आहोत. मी १९९०च्या दशकात लतादीदींच्या संपर्कात आलो. मुघल-ए-आझमनंतर मी लतादीदींच्या आवाजाच्या प्रेमात पडलो. मी पहिल्यांदा चेन्नईमध्ये 'जिया जले...' या गाण्यादरम्यान स्टुडिओत त्यांना भेटलो. त्यांची ती पहिली भेट माझ्यात कायम स्मरणात राहिली.'
रेहमान म्हणाले 'लतादीदींकडून खूप की, काही शिकण्यासारखे आहे. मी सुरुवातीला जेव्हा कुठलाही कार्यक्रम करायचो, तेव्हा कार्यक्रमाआधी एक तास थोडा झोपायचो. पण मी जेव्हा मंगेशकर यांना कार्यक्रमाआधी रियाज करताना पाहिले, तेव्हापासून मीदेखील झोप न घेता रियाज करण्यावर भर देतो. यातून कार्यक्रम अधिक दर्जेदार होतात आणि ही सवय मी कायम ठेवली आहे. संगीत क्षेत्रात येणाऱ्या नव्या युवकांनी या गोष्टी शिकणे खूप गरजेचे आहे.
एआयमुळे संगीत क्षेत्रात क्रांती येईल...
'एआय तंत्रज्ञान खूप पूर्वीपासून आहे' असे ए. आर. रेहमान यांनी सांगितले. ते म्हणाले, निदान संगीत क्षेत्रात १९८४ पासून एआयचा वापर होत आहे. कीबोर्ड हेदेखील एआय तंत्रज्ञानच आहे. पण, आता जे आहे, ते आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे संगीत क्षेत्रात नक्कीच क्रांती येणार आहे. मी स्वतः एआयचा वापर करण्यावर भर देत आहे. आगामी काळात मी इलॉन मस्क यांच्यासोबत एआयचा वापर करून एक अल्बम तयार करणार आहे', असे त्यांनी सांगितले.