लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जो कोणी मगो पक्ष सोडतो, तो पुन्हा निवडून येणे शक्य नाही. आजपर्यंत जे मगो पक्षात आले व सत्ता उभोगून मगो सोडून गेले त्यांचे काय झाले हे गोमंतकीयांना माहीत आहे, असा टोला मगोपचे नेते वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी लगावला आहे.
शुक्रवारी एका सोशल मीडिया चॅनेलवर ते बोलत होते. मंत्री ढवळीकर म्हणाले, मगो पक्ष बळकट आहे. पक्षाची कार्यकारी समिती सक्षम असून निवडणुकांवेळी आणि निवडणुकीनंतर ही समिती योग्य निर्णय घेत असते. त्यामुळे पक्षाचे काम चांगले चालले आहे. जो पक्षाच्या भल्यासाठी काम करत आहेत तो आज चांगल्या पदावर आहे. जे कोणी पक्ष सोडून गेले त्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आल्याचे ढवळीकर म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या विषयी बोलताना ढवळीकर म्हणाले की, बलाढ्य नेता मगो पक्ष सोडून गेल्यावर त्यांचे काय झाले आहे हे सर्वांना माहीत आहे.
सांगण्यास कारण की....
मगोमधून राजकारण सुरू करणाऱ्यांनी नंतर पक्ष सोडल्यावर जनतेनेही त्यांना नाकारले आहे. मागच्या वेळी मगो पक्षातून निवडून आलेले दीपक पाऊसकर व बाबू आजगावकर हे नंतर भाजपात गेले. पण त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व संकटात आले आहे. सध्या मांद्रेचे आमदार भाजपात जाणार अशी चर्चा सर्वत्र आहे. मात्र, त्यावर न बोलता मंत्री ढवळीकर यांनी काहींची उदाहरणे देत आपले मत नोंदवले.