पणजी : राज्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल व डिझेलचे दर वाढले असून त्याबाबतची अधिसूचना वाणिज्य कर खात्याने गुरुवारी रात्री उशिरा जारी केली. पेट्रोल आता लिटरमागे दोन रुपयांनी, तर डिझेल लिटरमागे एक रुपयाने महाग झाले आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच पेट्रोलचा दर लिटरमागे १ रुपये ९ पैशांनी कमी केल्याने गोमंतकीयांना थोडा दिलासा मिळला आहे. दि. १ आॅगस्टपासून राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर थोडे वाढतील, याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या २४ जुलै रोजी विधानसभेत केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. नव्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर आता वाणिज्य कर खाते साडेतीन टक्के व डिझेलवर बावीस टक्के मूल्यवर्धित कर आकारत आहे. या दरवाढीमुळे सरकारच्या तिजोरीत दरमहा सात कोटींचा महसूल जमा होणार आहे. वार्षिक सुमारे ८४ कोटी रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होणार असून हा महसूल राज्यात साधनसुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्याचे सरकारने ठरविले आहे. प्रस्तावित खांडेपार पूल, गालजीबाग, तळपण पुलासाठीही हा पैसा वापरला जाणार आहे. पेट्रोल स्वस्त करण्याची ग्वाही भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी दिली होती. मार्च २०१२ मध्ये भाजपचे सरकार अधिकारावर येताच पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराचे प्रमाण नाममात्र ठेवून सरकारने पेट्रोल लिटरमागे अकरा रुपयांनी स्वस्त केले होते. यापूर्वी पेट्रोलवर केवळ ०.१ टक्के मूल्यवर्धित कर ठेवल्याने राज्य सरकारला वार्षिक सुमारे दोनशे कोटींच्या महसुलास मुकावे लागले. आता डिझेलच्या दरातही सरकारने वाढ केल्याने वाहतुकीच्या दरांत वाढ होईल, असे बस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)े
पेट्रोल-डिझेल महागल
By admin | Updated: August 1, 2014 01:48 IST