नारायण गावस
पणजी: बुधवारी १ मे राेजी कामगार दिनानिमित्त ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) गोवा राज्य समिती आणि त्यांच्या इतर कामगार संघटनतर्फे पणजी भव्य रॅली आणि आझाद मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. या सभेत राज्यभरातून जवळपास १० हजार कामगार सहभागी होणार आहे, अशी माहिती आयटकचे कामगार नेते ॲड. राजू मंगेशकर यांनी साेमवारी आयटक कार्यालयात आयोजित केलेेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या सोबत आयटकचे नेते ॲड. प्रसन्ना उट्टगी व इरत उपस्थित हाेते.
ॲड. मंगेशकर म्हणाले, या भव्य सभेत सरकारकडून कामगारांच्या अधिकारांवर बंदी घालणे, खाजगी फार्मा कंपन्यांमध्ये एस्मा लागू करणे, कामावरुन काढून टाकणे, नोकऱ्यांचे नुकसान, कंत्राटी कामगार पद्धत, किमान वेतन, वाढती बेरोजगारी याविरुद्ध आम्ही एकजुटीने आवाज उठविला जाणार आहे. राज्यात सध्या बेराेजगारी वाढत आहे. खाण व्यावसाय बंद पडल आता पर्यटन व्यावसायही काेलमाेडला आहे. सरकारने विकासाच्या नावाखाली पर्यटनावर गदा आणली आहे. सरकारने कंत्राटी साेसायटी सुरु करुन कामगारांवर अन्याय केला आहे. यामुळे आज अनेक कामगार गेली अनेक वर्षे कंत्राटी तत्तावर काम करत आहेत.
कामगार नेते ॲड. प्रसन्ना उट्टगी म्हणाले, कामगारांना त्यांचे अधिकार मिळणे गरजेचे आहे. १ मे हा कामगार दिवस आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी आम्ही आयटकतर्फे हा दिवस साजरा करत आहोत. कामगारांना त्यांच्या अधिकारांविषयी मार्गदर्शन केले जाते. सध्या कामगारांची विविध खासगी क्षेत्रात सतावणूक सुरु आहे. त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.
कामगार संघटना आणि राजकीय विचारसरणीची पर्वा न करता सर्व कामगार बुधवार १ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कदंबा बसस्थानक पणजी येथे एकत्र येतील आणि रंगीबेरंगी झेंडे आणि बॅनर घेऊन पणजी शहरात आगमन करतील. या रॅलीचा समारोप आझाद मैदानावर जाहीर सभेत होऊन, हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून.